नागपूर : महाशिवरात्रीत उपवासानिमित्य शिंगाड्याचे पीठ व उपवास भाजणी पीठापासून तयार केलेल्या खाद्य पदार्थ खाल्ल्याने शहर व ग्रामीण भागातील १०० हून अधिक जणांना रुग्णालयांत दाखल होण्याची वेळ आली होती, याला १५ दिवसांचा कालावधी होत नाही तोच गुरुवारी पुन्हा शिंगाड्याचा पीठाचे शेव खाल्याने तीन महिलांसह सात पुरुष असे एकूण १० जणांना एका खासगी रुग्णालयात भरती व्हावे लागले.
७ व ८ मार्च रोजी तयार भगर व शिंगाड्याचा पिठापासून तयार केलेले खाद्य पदार्थ खावून तर काहींना हॉटेलमधील फराळी चिवडा व जिलेबी खाल्ल्यानंतर उलट्या, मळमळणे, पोटात दुखणे व अतिसाराची लक्षणे दिसून आली. जवळपास १००वर जणांना शासकीयसह खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. एकट्या मेयोमध्ये ३४वर रुग्ण भरती होते. या घटनेला गंभीरतेने घेत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) उपवासाची भाजणी, भगर, सिंगाडा पिठ, सिंगाडा (अख्खा), राजगिरा आटा, फराळी चिवडा, खवा जिलेबी अशा एकूण ९ अन्न पदार्थाचे नमुने घेतले.
विश्लेषणासाठी ते प्रयोगशाळेत पाठविले. एकूण १ लाख ३२ हजार ९०० रुपये किंमतीचा साठाही जप्त केला. या शिवाय, एकुण ८ आस्थापनांच्या विरुध्द पुढील कायदेशीर कारवाई प्रक्रिया सुरू केली. उपवासाची भाजणी पीठ, सिंगाडा आटा उत्पादकास संबंधित बॅचचा साठा बाजारातून परत बोलविण्याचे आणि पुढील आदेशापर्यंत व्यवसाय बंद करण्याचे लेखी आदेशही दिले. एका कंपनीवर गुन्हाही दाखल करण्यात आला. परंतु निकृष्ट दर्जाचे भगर, शिंगाड्याचे पीठ अद्यापही मार्केटमध्ये असल्याने कठोर कारवाई कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नाश्यात खाल्ली शिंगाड्याचा पीठाची शेव
प्राप्त माहितीनुसार, मिहानमधील एका प्रतिष्ठीत फार्मा कंपनीत काम करणाऱ्या १० कर्मचाऱ्यांनी कंपनीमधीलच कॅन्टीमधील शिंगाड्याचा पीठाची शेव खाल्ली. त्यानंतर तीन ते चार तास होताच सर्वांनाच मळमळ, उलट्या, पोटदुखीचा त्रास सुरू झाला. काही थंडी वाजून थरथर कापायला लागले. कंपनीच्या अधिकाºयांनी तातडीने त्यांना किंग्जवे हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
पदार्थात ‘अल्फा टॉक्सीन’ असण्याची शक्यता
रुग्णांवर उपचार करणारे डॉ. हर्षवर्धन बोरा यांनी ‘लोकमत’ला सांगितले, महाशिवरात्रीच्यावेळी जसे अन्नातून विषबाधेचे रुग्ण आढळून आले होते तशीच लक्षणे या रुग्णांना दिसून येत आहेत. अन्नात ‘अल्फा टॉक्सीन’ असल्यामुळे विषबाधा होते. विषबाधा झालेल्या दहा पैकी तीन महिला आहेत. त्यांची प्रकृती खालवल्याने त्यांना ‘आयसीयू’मध्ये तर सात पुरुषांना वॉर्डात भरती करण्यात आले. सर्वांची प्रकृती स्थिर आहे.