लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मणप्पुरम गोल्डच्या कार्यालयातून ३० किलो सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटणाऱ्या बिहारमधील सुबोध सिंह गँगचा आणखी एक सदस्य जरीपटका पोलिसाच्या हाती लागला. या प्रकरणात १७ महिन्यानंतर पोलिसांनी केलेली ही दुसरी अटक आहे. रोशन कुमार मिथिलेश प्रसाद (३०) रा. नालंदा, बिहार असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.२८ सप्टेंबर २०१६ रोजी जरीपटकातील भीम चौकात बंदुकीच्या जोरावर बिहार येथील कुख्यात दरोडेखोर सुबोध सिंह याने आपल्या साथीदारांच्या मदतीने मणप्पुरम गोल्डच्या कार्यालयात दरोडा टाकून ३० किलो सोने व रोख रक्कम लुटून नेली होती.सुबोध सिंह गँगने अनेक राज्यांमध्ये गोल्ड लोन देणाऱ्या अनेक संस्थांच्या कार्यालयांवरही असेच दरोडे टाकले आहेत. ही घटना सीसीटीव्हीमध्येही कैद झाली होती. सुबोध सिंह हा कुख्यात असल्याने त्याची लवकर ओळख पटली. त्याच्या शोधासाठी गुन्हे शाखा आणि जरीपटका पोलीस अनेकदा बिहारला जाऊन आले. परंतु त्याचा कुठलाही पत्ता लागला नाही. सुबोधच्या पत्नीला अटक करण्यात आली. ती सुद्धा जामिनावर सुटल्यापासून गायब आहे. एक महिन्यापूर्वी बिहारमधील स्पेशल टास्क फोर्सने (एटीएफ) सुबोध सिंहला पकडले. त्याच्याजवळून २० किलो सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. तो पकडल्यामुळे त्याचे इतर साथीदारही सापडण्याची शक्यता बळावली होती. जरीपटका येथील दरोड्या प्रकरणाबाबतही सुबोधला विचारपूस झाली आहे. त्याने सांगितल्यानुसार नागपूरमध्ये दरोडा टाकल्यानंतर तो व त्याचा साथीदार मनीष सिंह हे वाराणसीला निघून गेले होते.अटक करण्यात आलेला आरोपी रोशन कुमार हा सुबोधचा मावस भाऊ असून तोही या टोळीचा सदस्य आहे. रोशन टॅक्सी चालवतो. वाराणसीवरून पटण्याला जाण्यासाठी सुबोधने रोशन कुमारला बोलावले होते. त्याच्या टॅक्सीमध्ये ते पटण्याला गेले. १२ हजार रुपये भाडेही दिले. सुबोधने बिहार पोलिसांना ही गोष्ट संगितली. बिहारच्या एसटीएफने रोशनचा शोध घेतला असता सुबोध गायब झाल्यापासून तोही गायब असल्याचे आढळून आले. बिहार एसटीएफ आणि जरीपटका पोलिसांनी शोधमोहिम हाती घेतली. रोशन कुमार परत आल्याचे माहीत झाले. या आधारावर सोमवारी संयुक्त कारवाईद्वारे त्याला अटक करण्यात आली.
नागपूरच्या मणप्पुरम गोल्ड दरोड्यातील आणखी एका आरोपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 9:38 PM
मणप्पुरम गोल्डच्या कार्यालयातून ३० किलो सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटणाऱ्या बिहारमधील सुबोध सिंह गँगचा आणखी एक सदस्य जरीपटका पोलिसाच्या हाती लागला.
ठळक मुद्देसुबोध सिंह गँगचा सदस्य : जरीपटका पोलिसांची कारवाई