लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अमरावतीच्या एका व्यापाऱ्याला स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून त्याला भुसावळमध्ये बोलवून कुख्यात संतोष आंबेकरने त्यांच्याकडून २७ लाख रुपये हडपले. संतोषने फसवणूक केल्याचे ध्यानात आल्यामुळे व्यापाऱ्याने त्याला पोलिसांत तक्रार करण्याचा धाक दाखविला. त्यामुळे त्यांना पैसे परत देतो म्हणून नागपुरात बोलवले आणि येथे त्यांना पिस्तुलाच्या धाकावर बेदम मारहाण केली. त्यांना एका खोलीत डांबून ठेवले आणि त्यांच्याकडून २९ हजार रुपये तसेच ९ हजारांचा मोबाईलही हिसकावून घेतला. पाच वर्षांपूर्वीच्या या प्रकरणाची पीडित व्यापाऱ्याने लकडगंज ठाण्यात आज तक्रार नोंदवली. त्यामुळे संतोष आणि त्याच्या सात साथीदारांविरुद्ध पोलिसांनी पुन्हा एक गुन्हा दाखल केला.जयेश धंदुकिया (वय ३५) असे पीडित व्यापाऱ्याचे नाव आहे. ते अमरावतीला राहतात. कुख्यात संतोषच्या साथीदाराने त्यांना २०१४ मध्ये स्वस्त किमतीत सोने देतो, असे आमिष दाखवून भुसावळला बोलावले. त्यानुसार ३ ऑक्टोबर २०१४ ला जयेश कुख्यात संतोष आणि साथीदारांकडे २७ लाख रुपये घेऊन पोहचले. ही रक्कम हिसकावून घेत पोलिसांचा छापा पडल्याची थाप मारत आरोपींनी जयेश यांना पळवून लावले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यामुळे जयेश यांनी आपली रक्कम परत केली नाही तर पोलिसांकडे तक्रार करेल, असे म्हटले. त्यामुळे कुख्यात संतोषने रक्कम परत करतो, असे म्हणत आपल्या इतवारीतील घरी २० नोव्हेंबर २०१५ बोलवून घेतले. येथे संतोषने जयेश यांना पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. तर, संतोषसोबत असलेला गुड्डू शाहू, विपुल शाहू, महेश, क्रिष्णा आणि त्यांच्या साथीदारांनी जयेश यांना एका खोलीत डांबून बेदम मारहाण केली. त्यांच्याजवळ असलेले २९ हजार रुपये आणि मोबाईलही हिसकावून घेतला.फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्नमोठी रक्कम हडपणारा कुख्यात संतोष आणि साथीदारांनी त्यावेळी जयेशची कशीबशी सुटका केली, मात्र नंतरही अनेक दिवस त्यांचा छळ केला. त्याला कंटाळून जयेशने फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यातून ते कसेबसे बचावले. मात्र, जीवाच्या धाकाने नंतर ते गप्पच बसले.आता पाच वर्षांनंतर कुख्यात संतोष आणि टोळीचे पाप उघड्यावर आल्याने आणि पोलिसांनी कडक कारवाई केल्याने जयेश यांनी नागपूर पोलिसांशी संपर्क साधला. या पार्श्वभूमीवर लकडगंज ठाण्यात जयेश यांची गुरुवारी तक्रार नोंदवून घेत आरोपी संतोष आणि साथीदारांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.चार दिवसांची पोलीस कोठडीतब्बल २५ वर्षांपासून अनेकांना लुटणाऱ्या, अनेकांचे जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या आणि अनेकांचे जगणे मुश्कील करणाऱ्या कुख्यात संतोष आंबेकरला अखेर पोलिसांनी कायद्याचा चाबूक दाखविला. त्यामुळे संतोष आणि साथीदारांविरुद्ध एकापाठोपाठ अनेक गुन्हे दाखल झाले. त्यात एका डॉक्टर तरुणीने बलात्काराचीही तक्रार नोंदवली. ती १५ वर्षांची असतानापासून संतोष तिचा लैंगिक छळ करीत असल्याचे तक्रारीत नमूद असल्याने पोलिसांनी पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला प्रॉडक्शन वॉरंटच्या आधारे बुधवारी ताब्यात घेतले. गुरुवारी सहायक पोलीस निरीक्षक अनुपमा जगताप यांनी कुख्यात संतोषला कोर्टात हजर करून, त्याचा चार दिवसांचा पीसीआर मिळवला.२७ लाखांत १२ बिस्कीटे !संतोष आणि त्याच्या टोळीने जयेशला २७ लाखांत स्वितझरलॅण्डमधून १२ सोन्याचे बिस्कीट (प्रत्येकी १०० ग्राम) देण्याचे आमिष दाखवले होते. त्यामुळे आपले आईसक्रीमच्या दुकानातील होते नव्हते ते सर्व आणि कर्ज घेऊन कुख्यात संतोषच्या टोळीच्या हातात २७ लाख रुपये घातले होते. संतोषकडून लुटल्यागेल्यानंतर जयेश आणि कुटुंबीयांना जीवाच्या धमक्या मिळत असल्याने त्याने आपले गावच नव्हे तर प्रांतच सोडला होता. तो गुजरातमध्ये जाऊन मोलमजुरी करू लागला.