मंगळवारी मध्य प्रदेश वनविभागाच्या पथकाने महाराष्ट्र सीमेवरील खवासा येथून बालचंद वरकडे नामक आराेपीला अटक करून त्याच्याकडून ८.९ किलाे वजनाच्या वाघांची हाडे तसेच हरणाचे शिंग जप्त करण्यात आले हाेते. प्राथमिक चाैकशी केल्यानंतर आराेपीने दिलेल्या माहितीनुसार नागपूर वनविभागाच्या पथकाने बुधवारी पिंडकापार येथे राहणाऱ्या राेशन नंदलाल उईके यांच्या घराची झडती घेतली. त्याच्यात एक बंदूक, हरणाचे शिंग तसेच रानडुकराची कवटी आढळून आली. पथकाने लगेच आराेपीला ताब्यात घेतले व वन्यजीव अवयव जप्त केले. आराेपीची झाडाझडती घेतल्यानंतर नर्बद पुन्नू काेडवते नामक त्याच गावातील आराेपीकडेही वन्यजीव अवयव असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार आराेपीच्या घरी धाड टाकून झडती घेतली असता एक बंदूक, हरणाची ४ शिंगे, एक सुरा आदी साहित्य जप्त करण्यात आले.
नागपूर वनविभागाचे उपवनसंरक्षक डाॅ. भारतसिंह हाडा यांच्या मार्गदर्शनात नागपूर वनवृत्त विभागीय वनाधिकारी पी.जी. काेडापे, सहायक वनसंरक्षक एन.जी. चांदेवार, सहायक वनसंरक्षक एस.बी. गिरी, वनपरिक्षेत्र अधिकारी एस.बी. माेहाेड, आर.डी. शेंडे यांच्यासह वनकर्मचाऱ्यांचा या कारवाईत समावेश हाेता. आराेपींकडून मुद्देमाल जप्त करून पुढील तपास रामटेक उपविभाग यांच्याकडे साेपविण्यात आला.