- शेतमालकाचे अपहरण
- जीवे मारण्याची धमकी
- १३ वर्षे मुस्कटदाबी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेतमालक आणि त्याच्या मुलाला अपहरण करून जीवे मारण्याची धमकी देत कोट्यवधींची जमीन हडपल्याप्रकरणी गँगस्टर रंजीत सफेलकर आणि त्याच्या टोळीतील गुंडांविरुद्ध गुन्हे शाखेने शुक्रवारी पुन्हा एक गुन्हा नोंदविला.
सफेलकरसोबत भूमाफिया संजय आनंदराव धापोडकर, गुड्डू ऊर्फ भास्कर पांडुरंग धापोडकर, राकेश हरिशंकर गुप्ता, नीलेश हेमंत ठाकरे आणि कालू नारायण हाटे यांचाही या गुन्ह्यात आरोपी म्हणून सहभाग आहे.
रवींद्र ऊर्फ रवी नथुजी घोडे (वय ५०) हे कामठीजवळच्या अजनी बुद्रुक येथे राहतात. त्यांची मौजा घोरपड येथे शेती आहे. १५ जून २००८ पासून गँगस्टर रंजीत सफेलकर, संजय धापोडकर आणि त्यांच्या उपरोक्त साथीदारांनी या शेतीकडे नजर वळवली. शेती बळकावण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कटकारस्थान रचले. फिर्यादी रवी घोडे आणि त्यांच्या मुलाचे अपहरण केले. त्यांना ठार मारण्याची धमकी देऊन त्यांच्या शेतीवर कब्जा केला. तेथे लेआउट टाकून त्यातील ९१ लाख रुपयांचे प्लॉट परस्पर विकून टाकले. याबाबत कुठे काही बोलला तर जीवे ठार मारू, अशी धमकीही दिली. जीवाच्या भीतीमुळे घोडे गप्प होते. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिलेल्या आदेशानंतर गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून गँगस्टर सफेलकर आणि त्याच्या टोळीवर कंबरमोड कारवाई केली. त्यामुळे या टोळीच्या दहशतीत असलेल्या अनेक पीडितांना दिलासा मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर, घोडे यांनी गुन्हे शाखेत येऊन आपल्यावरील अन्यायाची फिर्याद नोंदवली. त्यानुसार नवीन कामठी पोलीस ठाण्यात शुक्रवारी सफेलकर, धापोडकर आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध विविध कलमानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
---
धापोडकरच्या पापाचे खोदकाम
धापोडकर हा उत्तर नागपुरातील कुख्यात भूमाफिया आहे. त्याने गुंडांच्या मदतीने अनेकांच्या जमिनी, भूखंड हडपले आहेत. त्याच्यामागे गुंडाचे पाठबळ असल्यामुळे धापोडकरविरुद्ध कुणी तक्रार द्यायचे धाडस करत नाही, हे विशेष!