नागपूर : काही दिवसांपूर्वी उत्तरेकडे सरकलेला मान्सून ट्रफ पुन्हा दक्षिणेकडे सरकत असल्याने विदर्भासह महाराष्ट्रात पुन्हा मान्सून सक्रिय झाला आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी तर मुंबई, काेकणासह विदर्भात पुढचे चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत शनिवारी पावसाची रिपरिप सुरू हाेती. तर गडचिराेलीला पुन्हा पावसाने तडाखा दिला आहे.
दाेन दिवस काहीसा शांत राहिलेल्या पावसाने शुक्रवारी रंग बदलला. नागपूरसह सर्व भागात सायंकाळपासून रिपरिप सुरू झाली. गडचिराेली व गाेंदियाला मात्र जाेरदार धडक दिली. गडचिराेली शहरात शनिवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत २४ तासात तब्बल १२९ मि.मी. पावसाची नाेंद झाली. शनिवारी दिवसभरही गडचिराेलीला मुसळधार पावसाने झाेडपले. येथे १२ तासांत ९० मि.मी. पावसाची नाेंद झाली. जिल्ह्यात चामाेर्शी, कुरखेडा, अहेरी भागातही पावसाचा जाेर वाढला आहे. विशेष म्हणजे दाेन दिवस उसंत घेण्यापूर्वी दहा दिवस गडचिराेलीच्या अनेक तालुक्यांनी पुराचा तडाखा सहन केला आहे. याशिवाय गाेंदियामध्येही पावसाचा जाेर चांगलाच वाढला आहे. सकाळी ८.३० वाजेपर्यंत ३९.९ मि.मी तर सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत १९ मि.मी. पावसाची नाेंद झाली.
नागपुरात सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत २४ तासात १८.९ मि.मी. पाऊस पडला. भिवापूर तालुक्यात १४.५ मि.मी. पावसाची नाेंद झाली. चंद्रपूर जिल्ह्यातही शुक्रवारी रात्री पावसाने थैमान घातले हाेते. शहरात शनिवारी सकाळपर्यंत ५८.७ मि.मी तर दिवसा १५ मि.मी. पाऊस बरसला. जिल्ह्यात मूल तालुक्यात ७६.९ मि.मी. नाेंदीसह पावसाने चांगलेच झाेडपले. वर्धा येथे सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत २४ तासांत ४४.६ मि.मी. पाऊस झाला. यवतमाळात ३१ मि.मी. नाेंद झाली. आर्णी तालुक्यात ५६.२ मि.मी. पावसाची नाेंद झाली. अमरावतीच्या चिखलदऱ्यात धाेधाे पाऊस हाेत आहे. येथे सकाळपर्यंत ५५.५ मि.मी. पाऊस नाेंदविला. याशिवाय अकाेला, भंडारा, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातही पावसाची रिपरिप सुरू आहे.