नागपूर : मनपाच्या लक्ष्मीनगर झोनमधील ७२ वर्षीय रुग्णाचा झालेला मृत्यू हा इन्फ्लुएन्झा ‘एच३ एन२’ने झालेला नाही, असा अहवाल बुधवारी इन्फ्लएन्झा ‘एच३ एन२’ मृत्यू अन्वेषण समितीने सादर केला. धक्कादायक म्हणजे, आणखी एका ३५ वर्षीय तरुणाचा या आजाराने मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे. या मृत्यूकडे ‘एच३ एन२’ संशयित म्हणून पाहिले जात आहे.
मनपा आरोग्य विभागाच्या मृत्यू विश्लेषण समितीची बैठक बुधवारी मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
या बैठकीत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, डॉ. रवींद्र खडसे, डॉ. प्रवीण सलामे, मनपाचा साथरोग विभागाचे नोडल अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे, डॉ. शबनम खान आदी उपस्थित होते.
-७२ वर्षीय रुग्णाला सहव्याधी असल्याने मृत्यू
२ मार्च २०२३ रोजी ७२ वर्षीय पुरुष रुग्णाला श्वास घेण्यास त्रास, ताप व खोकला असल्यामुळे रामदास पेठ येथील खासगी रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले. त्यांना धूम्रपानाची सवय होती. शिवाय, उच्च रक्तदाब, मधुमेह व श्वसनाचाही विकार होता. दरम्यान, त्याची ‘एच३ एन२’ तपासणी पॉझिटिव्ह आली. ९ मार्च रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा मृत्यू सहव्याधी असल्यामुळे झाल्याचे समितीने स्पष्ट केले.
-३५ वर्षीय रुग्णाचा ‘एम्स’मध्ये मृत्यू
हृदयाचा गंभीर आजार असलेल्या ३५ वर्षीय रुग्णाच्या मृत्यूपूर्वी ‘एच३ एन२’ तपासणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचार सुरू असतानाच १४ मार्च रोजी त्याचा मृत्यू ‘एम्स’मध्ये झाला. गुरुवारी आरोग्य विभागाच्या ‘डेथ ऑडिट’समोर या मृत्यूचे विश्लेषण केल्यावरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.
-कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
मनपाच्या आरोग्य विभागाने कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष न करण्याचे व सर्दी, खोकला, ताप असल्यास ‘एच१ एन१’ व ‘एच३ एन२ची’ तपासणी करण्याचे आवाहन केले आहे. ही तपासणी सर्व शासकीय रुग्णालयात उपलब्ध आहे. विशेषत: सहव्याधी असलेल्या रुग्णांनी अधिक काळजी घेण्याचा सल्लाही दिला.
-‘एच३ एन२’ टाळण्याकरिता ही काळजी घ्या
: हात सातत्याने साबण व पाण्याने धुवा
: गर्दीमध्येजाणे टाळा
: रुग्णापासून किमान ६ फूट दूर राहा
: खोकताना व शिंकताना तोंडाला रुमाल लावा
: भरपूर पाणी प्यावे, पुरेशी झोप घ्यावी
: पौष्टिक आहार घ्या