नागपूर : नागपूर आणि नवे विश्व विक्रम असे एकमेकांना पूरक झाले आहेत. नित्य नव्या विक्रमांना वळसा घालण्याचा पराक्रम नागपूरकरांकडून होत आहे. त्यात आता आणखी एका नव्या विक्रमाची भर पडणार असून, हा विक्रम १५० दिवस गायनाचा आहे. नागपूरचे विश्व विक्रमधारी गायक सुनील वाघमारे हा प्रयत्न करत आहेत. त्यातील ७३ दिवस रविवारी पूर्ण झाले आहे.
सुनील वाघमारे यांनी १५० दिवस दररोज दोन तास गायन करण्याचा संकल्प घेतला आणि या अभियानास २५ सप्टेंबर २०२० पासून सुरूवात केली. संकल्पानुसार २१ फेब्रुवारी २०२१ रोजी १५० दिवस पूर्ण होणार आहेत. यासाठी त्यांनी ९०० गाण्यांची निवड केली आणि दररोज २५ गाणी कुठल्याही व्यत्ययाशिवाय सादर करण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने दर ३६ दिवसात ९०० गीतांची एक फेरी पूर्ण होते. त्यानंतर पुन्हा पहिल्या गाण्यापासून सुरुवात होते. आतापर्यंत अशा दोन फेरी पूर्ण झाल्या असून, आतापर्यंत १८२५ गाणी त्यांनी सादर केली आहेत. या प्रयत्नाची नोंद रेकॉर्ड बुकमध्ये होण्यासाठी त्यांनी भटिंडा, पंजाब येथील युनिक वर्ल्ड रेकॉर्डशी संपर्क साधला असून, ते दररोज दुपारी १ ते ३ या वेळेत वाघमारे यांचा प्रयत्न बघत आहेत. विशेष म्हणजे, या दोन तासात ते सलग २५ गाणी कुठल्याही व्यत्ययाशिवाय सादर करत आहेत. हा एक प्रकारे अत्यंत आगळावेगळा प्रयोग आहे. यापूर्वी गुजरातच्या एका गायकाने १३४ दिवस दररोज एक तास गायनाचा पराक्रम केला होता. मात्र, वर्ल्ड रेकॉर्ड अमेजिंगने त्याचे १०० दिवसच गृहित धरून त्याची नोंद राष्ट्रीय रेकॉर्ड म्हणून केली होती. अशा तऱ्हेने वाघमारे १५० दिवसात ३७५० गाणी सादर करणार आहेत.
* टाळेबंदीमुळे गायनाचा हा कार्यक्रम जाहीर करता आला नाही. महाल, संघबिल्डिंगजवळ असलेल्या माझ्या कार्यालयात हा उपक्रम राबवित आहे. आतापर्यंत साक्षीदार म्हणून दररोज दोन-तीन अशा ४०० लोकांनी हजेरी लावली आहे. शिवाय फेसबुक लाईव्ह असल्याने एकाच वेळ जगभरातील लोक माझ्या या प्रयत्नाला हातभार लावत आहेत.
- सुनील वाघमारे, गायक
* सलग १०५ तास गायनाचा विश्वविक्रम
सुनील वाघमारे यांच्या नावे सलग १०५ तास कुठल्याही व्यत्ययाशिवाय गाण्याचा विश्वविक्रम आहे. या विक्रमाची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने केली आहे. ३ ते ७ मार्च २०१२ दरम्यान सलग १०५ तासात १२५२ गाणी त्यांनी सादर केली होती. विशेष म्हणजे, अद्यापही हा विक्रम कुणी मोडू शकला नाही.
.................