नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर २५ वर्षांपासून उभे असलेल्या एका विमानानंतर आता गेल्या पाच वर्षांपासून उभे असलेले दुसरे एक बिझनेस जेट विमानसुद्धा भंगार होण्याच्या मार्गावर आहे.
विमानतळावर उभे असलेले कॉन्टिनेटल बी-७२० विमान ७६ सीट्सचे असून एनआरआय व्यावसायिक सॅम वर्मा यांचे आहे. १९९१ मध्ये नागपूर विमानतळावर या विमानाचे आकस्मिक लॅण्डिंग करण्यात आले होते. त्यानंतर हे विमान दुरुस्त झाले नाही आणि मालकाने विमानचे पार्किंग शुल्कही अदा केले नाही. या विमानाच्या शुल्काचा संबंध एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियाशी (एएआय) असून नागपूर विमानतळावर एएआयचे संचालक या प्रकरणी संपर्क करण्यात काहीही रुची दाखवित नाहीत.
हे विमान विमानतळावर उभे राहिल्यानंतर २० वर्षांनंतर दुसऱ्या व्यावसायिकाचे बिझनेस जेट बोम्बार्डियर चॅलेंजर विमान आले. दहा सीट क्षमतेचे हे विमान खराब नाही. पण बँकेच्या कर्जाचे प्रकरण निकाली न निघाल्याने उड्डाण भरू शकले नाही. पण बोम्बार्डियरच्या प्रकरणात मिहान इंडिया लिमिटेडला पार्किंगसाठी पूर्वीच जवळपास एक कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत. या रकमेतून याचे शुल्क कपात करण्यात येत आहे. पण कालावधी झाल्यानंतर पुन्हा शुल्क लागणे सुरू होईल. या दोन्ही विमानांनी विमानतळाच्या आतील एक भाग व्यापला आहे, हे विशेष.