लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोलीस भरतीचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देण्याची बतावणी करून एका पोलीस कर्मचाऱ्याने दोन सख्ख्या बहिणींसह तिघींचा विनयभंग केला. ही घटना उघड झाल्याने पुन्हा एकदा पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली असून, गिट्टीखदान पोलिसांनी आरोपी पोलीस कर्मचारी रवी श्रीकांत तिवारी (वय ३८) याला अटक केली.
मानकापूरच्या इंगोले लेआउटमध्ये राहणारा रवी पोलीस मुख्यालयात तैनातीला आहे, तर पीडित तरुणी गिट्टीखदानमध्ये राहतात. दोन सख्ख्या बहिणी आणि त्यांची एक चुलत बहीण अशा या तिघी पोलीस भरतीची तयारी करीत आहेत. त्यामुळे त्या काही दिवसांपूर्वी माहिती मिळविण्यासाठी पोलीस मुख्यालयात आल्या होत्या. तेथे आरोपी तिवारीसोबत त्यांची भेट झाली. सुस्वरूप मुली बघून तिवारीने त्यांना विचारपूस केली आणि स्वत:च प्रशिक्षक आहे, अशी थाप मारली. त्यांचा नाव, पत्ता आणि छंदही विचारून घेतले. त्यांना नृत्याची आवड असल्याचे कळाल्याने नृत्य प्रशिक्षण देण्याचीही तयारी दाखवली. त्यानंतर त्याने तरुणींचा पाठलाग सुरू केला. तो वारंवार घराजवळ येऊन इशारे करत असल्याचे लक्षात आल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी त्याला जाब विचारला असता तो उलटसुलट उत्तरे देऊ लागला. त्याच्यावर संशय आल्याने मुलींसह पालकांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात रविवारी धाव घेतली. तो लज्जास्पद वर्तन करीत असल्याचे मुलींनी सांगितल्यामुळे गिट्टीखदान पोलिसांनी वरिष्ठांना ही माहिती दिली. त्याची गंभीर दखल घेत वरिष्ठांनी तिवारीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, तिवारीला अटक करण्यात आली.
दोन दिवसांत दुसरा गुन्हा
लुटेरी दुल्हनच्या गुलाबी गँगमध्ये सहभागी होऊन अनेक महिलांचे शोषण करणारा पोलीस निरीक्षक अरविंद भोळेविरुद्ध याच गिट्टीखदानमध्ये शुक्रवारी बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. आता दोन दिवसांनंतर याच ठाण्यात पुन्हा तिवारीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.