लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंग्लंडवरून परतलेली ४२ वर्षांची आणखी एक महिला पॉझिटिव्ह आल्यानंतर बुधवारी तिला मेडिकलच्या विशेष वॉर्डात भरती करण्यात आले आहे. यासोबतच विदेशातून परतलेल्या सहा रुग्णांना कोरोना असल्याची पुष्टी झाल्यानंतर त्यांना मेडिकलमध्ये भरती करण्यात आले आहे. कोरोनाच्या बदलत्या स्वरूपामुळे प्रशासन सतर्क झाले आहे.
संबंधित महिलेचा नमुना घेऊन पुण्याला पाठविण्यात आला आहे. आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या नमुन्यांपैकी कुणाचाही अहवाल पुण्यावरून आला नसल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे यांनी दिली. राज्य शासनाच्या आदेशानंतर महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबरदरम्यान युरोप, मध्य पूर्व, दक्षिण आफ्रिकावरून परतलेल्या प्रवाशांचा शोध घेऊन आरटीपीसीआर तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी १७० प्रवाशांची यादी तयार करण्यात आली आहे. यातील ६५ जणांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली आहे. सध्या मेडिकलच्या विशेष वॉर्डात तीन पुरुष आणि तीन महिला रुग्ण भरती आहेत.
तीन विमान प्रवासी पॉझिटिव्ह
नागपूर विमानतळावर मंगळवारी ९३ प्रवाशांची कोविड तपासणी करण्यात आली. यातील तीन प्रवासी पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. सहा विमाने नागपुरात आली. यात दिल्ली येथून चार, अहमदाबाद येथून एक व गोवा येथून एक विमान आले. ६०७ प्रवाशांपैकी ९३ प्रवाशांची तपासणी करण्यात आली.