गांधी विचारातलीलाताई चितळे : सिटीझन्स फोरम फॉर इक्वॅलिटीतर्फे गांधी जयंती नागपूर : ब्रिटिशांनी भारतावर १५० वर्षे राज्य केले. इतर भारतीयांप्रमाणे महात्मा गांधीसुध्दा इंग्रजांचे गुलाम होते. मात्र आज ब्रिटिशांच्या सर्वोच्च संसदेसमोर गांधीजींचा पुतळा उभारावा लागला. याचे कारण म्हणजे गांधीजींचे विचार. महात्मा गांधींचे सत्य, अहिंसेचे विचार हे जगाला स्वीकारणे आवश्यक झाले आहे. फोफावलेला दहशतवाद आणि आर्थिक विषमता या अखिल विश्वाला भेडसावणाऱ्या समस्या आहेत. गांधीजींच्या विचारांमध्येच या समस्यांचे उत्तर आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक लीलाताई चितळे यांनी केले. सिटीझन्स फोरम फॉर इक्वॅलिटी या संस्थेच्यावतीने महात्मा गांधी जयंती समारोह आणि सुतकताई चरखा साधना अभियान आयोजित करण्यात आले. याप्रसंगी लीलाताई बोलत होत्या. महात्म्याचे विचार सत्य, अहिंसा आणि नैतिकता शिकविणारे आहेत. त्याचमुळे नैतिकता हरविलेल्या पाश्चात्त्य देशांना गांधींचे विचार स्वीकारावे लागत आहेत. मात्र दुर्दैवाची बाब म्हणजे पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करणाऱ्या आपल्या देशात त्यांचे विचार दुर्लक्षिले जात असल्याची खंत लीलातार्इंनी व्यक्त केली.गांधीविचार खुंटीवर टांगून ठेवल्याने सुराज्याचे स्वप्न अजून साकार झाले नसल्याचे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते गेव्ह आवारी, हरिभाऊ केदार, आत्माराम उखळकर, थ्रिटी पटेल, मधुकर निसाळ, हरीजन सेवक संघाचे निंबाळकर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह सलील देशमुख या कार्यक्रमात सहभागी झाले. सर्वच मान्यवरांनी आपले विचार मांडतांना गांधी उत्सवात तरुणांचा सहभाग नसल्याने खंत व्यक्त केली. यावेळी चरख्यावर सुतकताईच्या अभियांनांतर्गत देशपांडे गुरुजींनी रस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्यांना सुतकताईचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन सिटीझन्स फोरमचे अध्यक्ष मधुकर कुकडे यांनी केले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यात रघुवीर देवगडे, अरविंद देशमुख, माजी आमदार यादवराव देवगडे, ललित त्रिवेदी आदींनी परिश्रम घेतले.(प्रतिनिधी)
सर्व समस्यांचे उत्तर
By admin | Published: October 03, 2015 2:48 AM