बसपाची घौडदोड कुठे थांबली ? : १३ उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर आनंद डेकाटे नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत बसपाचे दहा नगरसेवक निवडून आले. तर तब्बल १३ उमेदवार हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले. एक उमेदावर केवळ १४ मतांनी चौथ्या क्रमांकावर फेकला गेला. बसपाचे जिंकलेले उमेदवार हे सर्व उत्तर नागपुरातून निवडून आले. दक्षिणेत एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. इतकेच नव्हे तर दक्षिण नागपुरात असलेल्या पक्षाच्या दोन जागा सुद्धा कायम ठेवता आल्या नाही. दुसरीकडे उत्तर नागपूरने मात्र गेल्या वेळच्या तुलनेत दोन नगरसेवक जास्तीचे निवडून दिले. त्यामुळे या निवडणुकीत बसपाचा विचार केला असता बसपाने उत्तर नागपुरात कमावले असून दक्षिण नागपुरात मात्र गमावले आहे. गेल्या निवडणुकीमध्ये बसपाने ९८ जागा लढविल्या होत्या. यापैकी त्यांचे एकूण १२ नगरसेवक निवडून आले होते. यापैकी ८ नगरसेवक हे उत्तर नागपुरातून तर दोन नगरसेवक दक्षिण नागपुरातून निवडून आले होते. दक्षिण-पश्चिम व पूर्व नागपुरातून प्रत्येकी एक नगरसेवक निवडून आला होता. १२ उमेदवार हे दुसऱ्या स्थानावर राहिले होते. त्यावेळी एकूण उमेदवारांनी दीड लाखावर मते घेतली होती. या निवडणुकीमध्ये बसपाने एकूण १०३ उमेदवार निवडणुकीत उतरविले होते. यामध्ये १० नगरसेवक निवडून आले. तर १३ नगरसेवक हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले. निवडून आलेले सर्व उमेदवार हे उत्तर नागपुरातूनच विजयी झाले, हे विशेष. म्हणजेच गेल्या वेळच्या तुलनेत उत्तर नागपूरने दोन नगरसेवक अधिकचे निवडून दिले. पश्चिम नागपुरातील काही भाग उत्तर नागपुरात जोडण्यात आला. हा भाग दलित बहुल असल्याचा फायदाही बसपाला मिळाला. निवडून आलेले सर्व उमेदवार हे नवीन आहेत, हे विशेष. या निवडणुकीमध्ये सुद्धा बसपाने जवळपास १ लाख ५० हजाराच्या जवळपास मते घेतली आहेत. मतांची टक्केवारी कायम राखण्यात बसपाला यश आले. दक्षिण नागपुरातील दोन जागा बसपाने गमावल्या. पूर्व नागपुरातून सागर लोखंडे यांचा अर्ज रद्द झाल्याने ते निवडणूक होण्यापूर्वीच पराभूत झाले. दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांना मिळालेली मते प्रभाग क्र. २ अर्चना शेंडे (७४०८), मंगेश ठाकरे (७६४७), रिना साळवे (८१३९), गौतम पाटील (५५१५), प्रभाग क्र. ५ पृथ्वीराज शेंडे (४६६९) प्रभाग क्रमांक ७ अभिषेक शंभरकर (७१३०), प्रभाग क्रमांक ९ किरण रोडगे-पाटणकर (७५५८), प्रभाग क्रमांक १७ प्रेरणा कुकडे (९३७५), तृप्ती नानवटकर (७७९०) प्रभाग क्र. ३३ अजय डांगे (१०१५५), भारती महल्ले (९७४१), सत्यभामा लोखंडे (९९५९), प्रभाग ३५ मेघा हाडके (७५२०) यांचा समावेश आहे. बसपाचे जिल्हाध्यक्ष जयकर व प्रदेश सचिव रमेश लोखंडे दक्षिण नागपुरातच राहतात. जयकर यांच्याकडे दक्षिणचा प्रभार होता. सर्व जागा त्यांनी वाटल्या. दक्षिण नागपुरात एकूण २८ जागा आहेत. परंतु १४ जागा लढविल्याच गेल्या नाहीत. जयकर यांनी आपल्या पुत्राला लढविले तर लोखंडे यांनी आपल्या पत्नीला लढविले. पुत्र व पत्नी प्रेमामुळे पक्षाला प्रचंड नुकसान झाले. दक्षिण नागपुरातून बसपा हद्दपार झाली. पक्ष तब्बल दहा वर्षे मागे गेला. तेव्हा नैतिकतेच्या आधारावर जिल्हाध्यक्ष व सचिवांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. उत्तम शेवडे, महाराष्ट्र प्रदेश कार्यालयीन सचिव बसपा
उत्तरने कमावले दक्षिणने गमावले
By admin | Published: February 25, 2017 3:06 AM