आशिष दुबेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा फटका राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालालाही बसणार आहे. अद्याप उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन पूर्ण न झाल्याने विद्यार्थ्यांना निकालासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागणार आहे.अद्यापही विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका कस्टडी, पोलीस कस्टडी आणि मूल्यांकनकर्त्यांकडेच पडून आहेत. या सर्व उत्तरपत्रिकांचे अद्याप मूल्यांकनही झालेले नाही किंवा पुढील प्रक्रियाही झालेली नाही. मात्र उत्तरपत्रिकांचे मूल्यांंकन सुरू असल्याचा दावा बोर्डाने केला आहे. शिक्षकांना उत्तरपत्रिका घरी नेऊन तपासण्याची परवानगी दिली आहे.प्रत्यक्षात वस्तुस्थिती अशी आहे की, गेल्या दीड महिन्यात बोर्डाच्या विभागीय कार्यालयाने उत्तरपत्रिकांची काहीच दखल घेतली नव्हती. २० एप्रिलला विभागीय अध्यक्ष रविकांत देशपांडे यांनी सर्व कस्टोडियनला एक पत्र पाठविले. त्यात, इतिहास व नागरिक शास्त्र विषयासह अन्य विषयांच्या तपासलेल्या उत्तरपत्रिका नियमितपणे पोस्ट आॅफिसला पाठवाव्यात. जेणेकरून त्या मूल्यांकनासाठी संबंधित शाळेपर्यंत पोहचविता येईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन लागू होण्यापूर्वीच दहावीच्या बहुतेक विषयांचे पेपर झाले होते. त्यांच्या उत्तरपत्रिका संबंधित शाळांकडे मूल्यांकनासाठी पाठविल्या होत्या. त्या अद्यापही मूल्यांकनकर्त्यांकडेच पडून आहेत. दुसऱ्या मूल्यांकनकर्त्यांकडे त्या पाठविण्यात आल्या नाहीत. त्यामुळे निकालाची अनिश्चितता कायम आहे.‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार काही विषयांच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाचे काम पूर्ण झाले आहे. उर्वारित उत्तरपत्रिका तशाच कस्टडीत किंवा पोलीस कस्टडीत पडून आहेत. बोर्डाच्या विभागीय अधिकाऱ्यांनी हा मुद्दा गंभीरपणे का घेतला नाही, हा खरा प्रश्न आहे. लॉकडाऊनच्या दरम्यान उत्तरपत्रिका सहजपणे पोस्ट आॅफिसपर्यंत पोहचविता आल्या असत्या. मूल्यांकनकर्त्यांना त्या घरी नेण्याची परवानगीही देता आली असती. दहावीचे बहुतेक सर्वच पेपर झाले आहेत. लॉकडाऊनमुळे भूगोल विषयाचा पेपर होऊ शकला नाही. त्यानंतर तो रद्द करण्यात आला. विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तरीही मूल्यांकनात ढिलेपणा करण्यामागचे कारण अनाकलनीय आहे. बोर्डाचे विभागीय अध्यक्ष रविकांत देशपांडे यांच्याशी या संदर्भात संपर्क केला, मात्र होऊ शकला नाही.जूनमध्ये निकाल अशक्यचराज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचे निकाल साधारणत: जून महिन्यात जाहीर होतात. मात्र यंदा उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन न झाल्याने निकाल कधी लागतील, याबद्दल शंका आहे. सूत्रांच्या मते, एकट्या नागपूर विभागात दहावीची परीक्षा देणाºयांची संख्या १ लाख ८० हजारावर आहे. एवढ्या मोठ्या संख्येतील विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करणे आणि प्रक्रिया पूर्ण करून निकाल जूनमध्ये जाहीर करणे अशक्य आहे. सर्व उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन पूर्ण होत नाही तोवर निकाल कधी लागतील, हे सांगणे कठीण आहे.