लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : कुंपणाच्या तारांमध्ये वीज प्रवाह प्रवाहित करून काळविटाची शिकार केल्याची घटना रामटेक वनपरिक्षेत्रातील वाकेश्वर शिवारात रविवारी (दि. १८) रात्री घडली. शिकाऱ्यास वन कर्मचाऱ्यांनी अटक केली असून, त्याच्याकडून शिकार करण्यासाठी वापरलेले साहित्य जप्त केले असून, मृत काळवीट नर असल्याची माहिती क्षेत्र सहायक डी. आर. अगडे यांनी दिली.
गुलाब हिराचंद सपाटे (४१, रा. वाकेश्वर, ता. रामटेक) असे अटक करण्यात आलेल्या आराेपी शिकाऱ्याचे नाव आहे. गुलाब सपाटे याचे वाकेश्वर शिवारात शेत असून, त्याने शेताभाेवती लाकडी खुंट्या ठाेकून तारांचे कुंपण केले आणि त्या तारांमध्ये वीज प्रवाह प्रवाहित केला. या तारांना स्पर्श झाल्याने काळविटाला विजेचा जाेरात धक्का लागला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.
वन कर्मचाऱ्यांनी या घटनेचा पंचनामा करून मृत काळवीट ताब्यात घेतले. गुलाबने शिकार करण्याच्या उद्देशाने तारांमध्ये वीज प्रवाह प्रवाहित केला हाेता, अशी माहिती डी. आर. अगडे यांनी दिली. मृत काळवीट अडीच वर्षाचे हाेते. शिकाऱ्याकडून लाेखंडी तार, वायर, लाकडी खुंट्या व टाॅर्च जप्त करण्यात आले. रामटेक येथील न्यायालयाने त्याला वन काेठडी सुनावल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याप्रकरणी वन्यजीव अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई क्षेत्र सहायक डी. आर अगडे, वनरक्षक एस. एस. केरवार, वनमजूर दीनदयाल सरोते यांनी केली.