लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : श्वान चावल्यानंतर ‘रॅबीज’ची बाधा होऊ नये म्हणून मनुष्याचे प्राण वाचविण्यासाठी ‘अॅण्टी रॅबीज’ लस महत्त्वाची ठरते. परंतु मनपाच्या पाच दवाखान्यातच ही लस उपलब्ध असायची. यातच मेयो व मेडिकलमध्ये केवळ दारिद्र्यरेषेखालील रुग्णांनाच ही लस नि:शुल्क दिली जाते. यामुळे अनेकांवर पदरमोड करून लस विकत घेण्याची वेळ यायची. याची दखल मनपाच्या आरोग्य विभागाने (एम) घेत आता १४ दवाखान्यात ही लस नि:शुल्क उपलब्ध करून दिली आहे.श्वानदंशामुळे दरवर्षी साधारण २० हजार लोकांचा मृत्यू होतो. यात १५ वर्षे वयोगटाखालील मुलांची संख्या सर्वाधिक आहे. लस न टोचलेले कुत्रे मुलांना चावल्याने हा रोग प्रामुख्याने जडतो. विशेष म्हणजे, श्वान चावल्यानंतर देण्यात येणारी लसीची किंमत गरिबांना परवडणारी नाही. यातही केवळ ‘बीपीएल’च्या रुग्णांनाच ही लस उपलब्ध करून देण्याचे मेयो, मेडिकलचे धोरण आहे. परंतु या दोन्ही रुग्णालयात नेहमीच ‘अॅण्टी रॅबीज’ लसीचा तुटवडा असतो. मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालय, पाचापवली सुतिका गृह, सदर रोग निदान केंद्र, महाल रोग निदान केंद्र व चकोले दवाखान्यात ही लस उपलब्ध असयाची. परंतु इतर भागातील रुग्णांना हे दवाखाने दूर पडायचे. यातच गल्ली-बोळ्यात कुत्र्यांचा वाढता त्रास व दंशाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन मनपाच्या आरोग्य विभागाने (एम) १४ दवाखान्यात लस उपलब्ध करून दिली आहे.या दवाखान्यात मिळणार लस‘अॅण्टी रॅबीज’ लस गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालय, कमाल टॉकीज मागील पाचपावली सुतिकागृह, इमामवाडा येथील आयसोलेशन दवाखाना, सदर येथील रोग निदान केंद्र, महाल येथील रोग निदान केंद्र, गरोबा मैदान जुना बगडगंज येथील चकोले दवाखाना, जयताळा येथील ‘अर्बन प्रायमरी हेल्थ सेंटर’ (युपीएचसी), झिंबागाई टाकळी येथील ‘युपीएचसी, नरसाळा येथील ‘युपीएचसी’, नंदनवन येथील ‘युपीएचसी’, मोमीनपुरा येथील ‘युपीएचसी’, पारडी येथील ‘युपीएचसी’, जागनाथ बुधवारी येथील ‘युपीएचसी’ व सतरंजीपुरा आरोग्य केंद्र .मनपा दवाखान्यांमध्ये स्वाईन फ्लूची लस२००९ पासून असलेली स्वाईन फ्लूची दहशत आजही कायम आहे. गेल्या वर्षी स्वाईन फ्लूचे सुमारे २१६ रुग्ण व १४ मृत्यूची नोंद आहे. यावर्षी विशेष उपाय म्हणून मनपाच्या आरोग्य विभागाचे आरोग्य अधिकारी डॉ. सरिता कामदार यांनी ५१ दवाखान्यात स्वाईन फ्लूची लस उपलब्ध करून दिली आहे. ही लस मनपाच्या सर्वच दवाखान्यात नि:शुल्क उपलब्ध आहे.४९ चाचण्या नि:शुल्कराष्ट्रीय आरोग्य मिशनच्या २६ दवाखान्यातून रक्ताच्या विविध ४९ चाचण्या नागपूरकरांसाठी नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मनपाच्या आरोग्य विभागाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच झाल्याचे बोलले जात आहे.