नागपूर : अमेरिकेतील सर्व विद्यापीठांमध्ये नावाच्या आधारावर जातिभेद केला जायचा. पण अमेरिकन उच्च शिक्षणात जातिभेदविरोधी चळवळ उभी केल्यानंतर ३५ विद्यापीठात कडक कायदे तयार झाले. त्याचे उल्लंघन करण्याची कुणीही हिंमत करीत नाहीत. ही चळवळ डॉ. आंबेडकरांच्या जातिभेद विरोधाच्या आधारावर उभी करण्यात आल्याची कबुली प्रा. लॉरेन्स सीमन यांनी येथे दिली.
प्रा. लॉरेन्स सीमन अमेरिकेच्या ब्रँडीस विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय विकासाचे प्राध्यापक आणि जीडीएस संचालक आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात दीक्षांत सभागृहात शुक्रवारी डॉ. नितीन राऊत आंतरराष्ट्रीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. तीत ‘डॉ. आंबेडकरवादी बौद्ध धम्म आणि अमेरिकन उच्च शिक्षणातील जातीविरोधी चळवळ’ या विषयावर प्रा. सीमन यांनी विचार मांडले. अध्यक्षस्थानी नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी होते. प्रमुख अतिथी प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे आणि माजी मंत्री डॉ. नितीन राऊत उपस्थित होते.
आपण ज्यू धर्मीय असल्याचे प्रा. लॉरेन्स यांनी सांगितले. ज्यू धमीर्यांवर पश्चिम युरोपात झालेले अत्याचार विसरता येणार नाही. ब्रँडीस विद्यापीठाच्या माध्यमातून जातीविरोधी चळवळ उभी केली. तसे पाहता भारताप्रमाणे अमेरिकेत उच्च शिक्षणात काही भागात जातीच्या आधारावर भेदभाव होतो. पण तो लवकरच दूर होईल. आम्ही आमची चळवळ आंबेडकरी चळवळीशी जोडली आहे. अनेकजण विद्यार्थ्यांच्या आडनावावरून जात शोण्याचा प्रयत्न करतात, हे चुकीचे आहे.
प्रारंभी डॉ. नितीन राऊत यांनी व्याख्यानमालेची माहिती दिली. संचालन डॉ. विकास जांभुळकर यांनी तर डॉ. राजू हिवसे यांनी आभार मानले. या प्रसंगी डॉ. सुखदेव थोरात व श्रीमती थोरात, डॉ. राजू मानकर, डॉ. मेश्राम, डॉ. हरीश पालीवाल, डॉ. अनिल हिरेखन आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.