नागपूर : नागपूर ते अजनी दरम्यान सुरक्षा भिंतीचा प्रस्ताव मागील चार वर्षांपासून धूळखात आहे. यामुळे रेल्वेच्या परिसरात असामाजिक तत्त्वांची संख्या वाढत आहे. असामाजिक तत्त्वांचा बंदोबस्त करण्यासाठी हे रखडलेले काम त्वरित पूर्ण करण्याची गरज निर्माण झाली आहे.
नागपूर ते अजनी दरम्यान अनेक रेल्वेगाड्यांचा वेग मंदावतो. प्लॅटफाॅर्मवर येण्यापूर्वी अनेकदा सिग्नल न मिळाल्यामुळे या परिसरात रेल्वेगाड्या सिग्नल मिळण्याची वाट पाहत उभ्या असतात. याचा फायदा घेऊन अनेकदा असामाजिक तत्त्व रेल्वेगाड्यात शिरतात. ते प्रवाशांची नजर चुकवून त्यांचे महागडे मोबाईल, साहित्य लंपास करतात. तर अनेकदा रेल्वेचे लोखंड रेल्वे रुळाशेजारी पडून असते. हे लोखंड चोरी करण्यात येते. सुरक्षा भिंतच नसल्यामुळे असामाजिक तत्त्व सहज रेल्वे रुळाच्या बाजूला पोहोचतात. त्यांना हटकण्यासाठी आऊटरकडील भागात आरपीएफचे जवानही हजर राहत नाहीत. याचाच फायदा असामाजिक तत्त्व घेतात. अनेकदा अवैध व्हेंडरही सुरक्षा भिंत नसल्यामुळे या भागातून रेल्वेगाड्यात प्रवेश करतात. या सर्व बाबींना आळा घालण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नागपूर ते अजनी दरम्यान त्वरित सुरक्षा भिंत उभारण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.
...........
प्रवाशांचा मोबाईल पाडतात खाली
अनेकदा रेल्वेस्थानक येण्यापूर्वी प्रवासी कोचच्या दारावर मोबाईलवर बोलत बसतात. आऊटरकडील भागात असामाजिक तत्त्व हातात काठ्या घेऊन उभे राहतात. प्रवासी मोबाईलवर बोलताना दिसल्यास हे असामाजिक तत्त्व काठी मारून प्रवाशाचा मोबाईल खाली पाडतात आणि मोबाईल घेऊन पसार होतात. अशा घटना अनेकदा घडल्या तरीसुद्धा सुरक्षा भिंत बांधण्यासंदर्भात दिरंगाई करण्यात येत आहे.
सुरक्षा भिंत महत्त्वाची
रेल्वे परिसरात असामाजिक तत्त्वांची संख्या वाढत आहे. सुरक्षा भिंत नसल्यामुळे असामाजिक तत्त्व सहज रेल्वे रुळापर्यत पोहोचतात. त्यामुळे असामाजिक तत्त्वांचा बंदोबस्त करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने त्वरित सुरक्षा भिंत उभारणे गरजेचे आहे. तसेच रेल्वे सुरक्षा दलाने आऊटरकडील भागात आरपीएफ जवानांची ड्युटी लावणे गरजेचे आहे.
-बसंत कुमार शुक्ला, महासचिव, भारतीय यात्री केंद्र.