न्यायालय : पंतप्रधान राष्ट्रीय मुद्रा योजनेच्या नावे लुबाडणूकनागपूर : पंतप्रधान राष्ट्रीय मुद्रा योजनेंतर्गत कर्ज मिळवून आर्थिक फायदा करून देतो, असे आमिष दाखवून महिला बचत गटातील सदस्यांची ११ लाख ९० हजार रुपयांनी फसवणूक करणाऱ्या एका ठकबाज दाम्पत्याचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशोक धामेचा यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला. शीतल गोविंदराव सोमकुंवर (शीतल महेंद्र देवरे) (३४) आणि तिचा पती महेंद्र देवराज देवरे (३७) रा. शेंडेनगर नारी रोड, असे या आरोपी दाम्पत्याचे नाव आहे. त्यापैकी शीतल ही एका विमा कंपनीची आणि महेंद्र हा खासगी वित्त कंपनीचा एजंट आहे. प्रकरण असे की, न्यू पांजरा टीचर कॉलनी येथे राहणाऱ्या द्रोपदी सुरेश प्रधान (५०) या एका बचत गटाच्या पदाधिकारी आहेत. त्यांच्यासोबत शीतल देवारे हिची ओळख होती. एक दिवस प्रधान यांना शीतलने असे सांगितले की, माझे पती केवळ आधारकार्डच्या आधारावर पंतप्रधान राष्ट्रीय मुद्रा योजनेच्या अंतर्गत महिलांना कर्ज मिळवून देण्याचे काम करतात. यासाठी केवळ २०० ते ३०० रुपये खर्च करावा लागेल. बचत गटातील महिलांना कर्ज मिळण्याच्या आशेवर द्रोपदी प्रधान यांनी तीनशेवर बचत गटातील महिलांकडून पैसे गोळा केले. ही रक्कम ११ लाख ९० हजार रुपये झाली होती. ही संपूर्ण रक्कम, प्रत्येक महिलेचे आधारकार्ड आणि इतर कागदपत्रे गोळा करून शीतल देवारे हिला देण्यात आले होते. शीतलने ही रक्कम आपल्या पतीला दिली होती. प्रत्यक्षात या दाम्पत्याने कर्ज मिळवून न देता फसवणूक केली. द्रोपदी प्रधान यांनी कोराडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवताच ठकबाज देवारे दाम्पत्याविरुद्ध १९ जानेवारी २०१६ रोजी भादंविच्या ४२०, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या दोघांनीही अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला असता न्यायालयाने तो फेटाळून लावला. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील उषा गुजर यांनी काम पाहिले. उपनिरीक्षक पुंडलिक बोंडे हे या प्रकरणाचे तपास अधिकारी आहेत. (प्रतिनिधी)
ठगबाज दाम्पत्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला
By admin | Published: February 21, 2016 3:07 AM