नागपूर : लोकमत समूहाचे संस्थापक संपादक स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जन्मशताब्दी वर्षपूर्ती पर्वाच्या अनुषंगाने ‘स्वरांजली’चे आयोजन शुक्रवार, ३० जून रोजी संध्याकाळी ७ वाजता रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात करण्यात आले आहे. यात प्रख्यात गायक व संगीतकार भजनसम्राट पद्मश्री अनुप जलोटा ‘भजन-गजल संध्या’ सादर करतील.
जवाहरलाल दर्डा यांची जयंती २ जुलै रोजी असून, २०२२ पासून जन्मशताब्दी वर्षाच्या अनुषंगाने प्रत्येक महिन्याच्या २ तारखेला लोकमतच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले आहे. त्यात दिव्यांग मुलांसाठी ‘तारे जमीन पर’ चित्रकला स्पर्धा, ऑटोचालक व डिलिव्हरी गर्ल्सचा सत्कार, महिलांच्या आरोग्याविषयी आरोग्यवती सेमिनार, शिक्षकांचा सत्कार आदी विधायक उपक्रमांचा समावेश होता. २ जुलै २०२३ रोजी बाबूजींची शंभरावी जयंती साजरी होत आहे. जन्मशताब्दी वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर ३० जून रोजी कविवर्य सुरेश भट सभागृहात पद्मश्री अनुप जलोटा बाबूजींना भजन व गजलच्या माध्यमातून स्वरांजली अर्पण करतील.
अनुप जलोटा हे भारतीय संगीत विश्वात भजन सम्राट म्हणून ओळखले जातात. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये गायन करण्यासोबतच अनेक गीतांना संगीतबद्धही केले आहेत. भारतीय संगीत क्षेत्रातील योगदानासाठी जलोटा यांना भारत सरकारने पद्मश्री हा सर्वोच्च सन्मान त्यांना प्रदान केला आहे. या कार्यक्रमात प्रवेशिका असणाऱ्यांनाच प्रवेश असणार आहे. त्याअनुषंगाने लोकमत वाचक, लोकमत सखी मंच सदस्य, लोकमत कॅम्पस क्लब सदस्यांना प्रवेशिका ‘लोकमत सखी मंच’ कार्यालय, लोकमत भवन, नागपूर येथून मिळवता येणार आहेत. अधिक माहितीसाठी ९८८१७४९३९०, ९९२२२०००६३ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.