नागपूर : चित्रपटसृष्टीतील नट-नट्यांसाठी वापरला जाणारा डायलॉग आज सुप्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यासाठी वापरला. रायसोनी समूहाच्या वतीने आयोजित मुलाखतीची सुरुवातच अनुपम खेर यांनी ‘नितीनजी मै आपका फॅन हूँ’ या डायलॉगने केली. हे ऐकताच उपस्थित तरुणांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि त्यानंतर गडकरी यांची मुलाखत बहरत गेली.
जी.एच. रायसोनी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सिव्हिल लाइन्स येथील स्व. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. अनुपम खेर यांनी कुटुंब, चित्रपट, मैत्री, राजकारण आदी विषयांवरील प्रश्न विचारून गडकरी यांना बोलते केले. विद्यार्थी दशेतील दिवस कसे होते, या प्रश्नावर गडकरी यांनी संघर्षमय दिवसांच्या आठवणी सांगितल्या. ‘नाटक मागून आणि सिनेमा समोरून बघणाऱ्या पोरांपैकी मी होतो. अभ्यासात कधीच चांगला नव्हतो. ते दिवस संघर्षाचे होते, पण आजच्यापेक्षा चांगले होते,’ असे गडकरी म्हणाले.
आपल्या आयुष्यात फोकस आवश्यक आहे, याची जाणीव कधी झाली, या प्रश्नाचे उत्तर देताना गडकरी यांनी किशोर कुमार यांच्या गाण्याच्या ओळी सांगितल्या. ते म्हणाले, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विद्यार्थी परिषदेत काम करताना समाजातील उपेक्षितांच्या कल्याणासाठी काही तरी करायला हवे, असे संस्कार माझ्यावर झाले. त्यानुसार काम सुरू केले आणि त्यानंतर ‘मैं तो चला जिधर चले रास्ता...मुझे क्या खबर है कहा मेरी मंजिल’ असे माझे आयुष्य पुढे जात राहिले.’
खेर यांनी आपल्या लोकप्रियतेचे रहस्य काय आहे, असा प्रश्न . त्यावर गडकरी म्हणाले, ‘मी कधी लोकप्रियतेचा फार विचार केला नाही आणि करत नाही. माझ्याबद्दल लोक काय बोलतात, याचीही फार चिंता करत नाही. नागपूर माझा परिवार आहे. इथे विरोधकही माझ्याकडे येतात, हीच माझी खरी शक्ती आहे.’
आवडता नट दारासिंग- आवडता नट कोणता आहे, असा प्रश्न गडकरी यांनी दारा सिंग यांचे फायटिंगचे सिनेमे मला खूप आवडायचे, असे सांगितले. अमिताभ बच्चन यांचे दिवार, जंजीर, आनंद हे चित्रपटही खूप आवडायचे आणि त्याचे डायलॉग्सही पाठ होते, असेही गडकरी म्हणाले. त्यानंतर अनुपम खेर यांनी ॲक्शन म्हटले आणि गडकरींनी ‘जली को आग कहते है, बुझी को राख कहते है...’ हा शत्रुघ्न सिन्हा यांचा लोकप्रिय डायलॉग म्हटला. त्यावर उपस्थित तरुणांनी टाळ्यांच्या कडकडाटासह दाद दिली.