लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. त्यात आपली बस १०० कोटीच्या तोट्यात आहे. याचा विचार करता मनपाची आपली बससेवा महामेट्रोला हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावाला गुरुवारी परिवहन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. वास्तविक शहरातील नागरिकांना उत्तम दर्जाची सेवा मिळावी, यासाठी परिवहन महामंडळाकडून मनपाने ही जबाबदारी स्वीकारली होती. आता ती महामेट्रोला देऊन जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न चालविला आहे.
राज्य परिवहन महामंडळाला वर्ष २००१ ते २००५ या कालावधीत नागपूर शहरातील बस संचालनात २०.६८ कोटीचा तोटा झाला होता. ही नुकसानभरपाई महापालिकेने द्यावी, अशी मागणी महामंडळाने मनपाकडे केली होती. परंतु मनपाने ही रक्कम देण्यास नकार दिला होता. ३ मार्च २००७ रोजी महामंडळाने शहर बससेवा संचालित करण्याची अनुमती मनपाला दिली. वास्तविक शहरातील नागरिकांना उत्तम दर्जाची बससेवा उपलब्ध व्हावी, यासाठी १९९४ पासून प्रयत्न सुरू झाले. अखेर ९ फेब्रुवारी २००७ रोजी महापालिका व वंश निमय इन्फ्राप्रोजेक्ट लिमिटेड (व्हीएनआयएल) यांच्यात दहा वर्षांचा करार झाला. करारानुसार २३० बस ऑपरेटरला सुरू करावयाची होती. यात १५० मोठ्या व ८० लहान बसचा समावेश होता.
यातील २०० बस सहा महिन्यात खरेदी करावयाच्या होत्या. बस खरेदी, कर्ज व बस नोंदणी, व्यवस्थापन सर्व व्यवस्था ऑपरेटरला करावयाची होती. करारानुसार व्हीएनआयएलला पाच वर्षांसाठी प्रतिबस दरमहा ३ हजार ७५० रुपये व त्यानंतर प्रतिमाह ४ हजार मनपाला द्यावयाचे होते.
जेएनएनयूआरएमच्या ३०० बस भंगारात
व्हीएनआयएल यांच्याशी झालेल्या करारानुसार २४० बस शहरात धावल्याच नाही. १६० ते १८० सुरू केल्या. जेएनएनयूआरएमच्या ३०० बस मनपाला मिळाल्या. अशाप्रकारे शहरात ५३० बस मिळाल्या. परंतु शहरात धावणाऱ्या बसची संख्या २४० च्या पुढे गेली नाही. पुढे ३०० बस भंगारात गेल्या. गाड्यांचे पार्ट चोरीला गेले. मोठा घोटाळा झाला.
नोटीसचा परिणाम नाही
करारानुसार शहरात बस धावत नसल्याने व प्रवाशांना सुविधा उपलब्ध न झाल्याने मनपा प्रशासनाने वंश निमय इन्फ्राप्रोजेक्ट लिमिटेडला शंभरहून अधिक नोटिसा बजावल्या. परंतु राजकीय पाठबळ असल्याने मनपाला ठोस निर्णय घेता आला नाही. २०१२ मध्ये शहर बससेवेची जबाबदारी अर्बन मॉस ट्रान्झिट कंपनी (यूएमटीसी)ला दिली. परंतु परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही.
कोट्यवधी बुडाले
केंद्र सरकारकडून मिळालेल्या २४० मधील १३० बस काही महिने सुरू होत्या. काही वर्षातच सर्व बस भंगारात निघाल्या. ऑपरेटरने मनपाकडे प्रवासीकराची १० कोटीची रक्कम जमा केली नाही. तिकिटाची रक्कमही मनपाकडे जमा केली नाही. ही रक्कम २५ ते ३० कोटीच्या आसपास असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.तीन ऑपरेटरची नियुक्ती
शहरातील बसव्यवस्था सुधारावी यासाठी वंश निमय यांचा करार संपुष्टात आणल्यानंतर २०१६ मध्ये मनपाने तीन ऑपरेटरची नियुक्ती केली. शहरात ३३६ बस धावायला लागल्या. परंतु मनपाला दर महिन्याला ८ ते १० कोटी तोटा सहन करावा लागत आहे. वर्षाला १०० ते ११० कोटीचा बोजा सहन करावा लागत आहे. महापालिकेने ४३२ रेड बसेस व ५५ ग्रीन बसेस या सेवेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु ग्रीन बस बंद पंडल्या. रेड बसही पूर्ण धावत नाही. आता महामेट्रोकडे देण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे.