लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : २१९ दिवसानंतर आज बुधवारी नागपूर शहरात आपली बस(शहर बस) सेवा सुरू झाली. परंतु पाच मार्गावर ४० बसेस सोडण्यात आल्या. पहिला दिवस असल्याने लोकांनाही बसच्या वेळापत्राकाची माहिती नव्हती. त्यामुळे सकाळी प्रवााशांची गर्दी नव्हती. दुपारीही प्रतिसाद नव्हता. दोन -तीन दिवसात प्रवाशांची गर्दी वाढेल, असा विश्वास परिवहन विभागाने व्यक्त केला.
बस सेवा सुरू झाल्याने बुटीबोरी, हिंगणा या औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना मोठा दिलासा मिळाला. बुधवारी ३० ते ४० टक्के प्रवासी होते. ३२ स्टँडर्ड व ८ मिडी बस सोडण्यात आल्या. पारडी मार्गावर फक्त आठ मिडी बस धावल्या. कोविडच्या पार्श्वभूमिवर कंडक्टर व ड्रायव्हर मास्क घालून होते. सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली होती. विना मास्क प्रवाशांना बसमध्ये प्रवेश नव्हता. पहिला दिवस असल्याने प्रवाशांची गर्दी नसल्याने जागेसाठी धावपळ करावी लागली नाही. परंतु गर्दी वाढल्यानंतर त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार २ नोव्हेंबर पासून ९० बस धावणार आहेत. त्यानंतरच्या आठवड्यात १५० बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दिवाळीनंतर पूर्ण क्षमतेने बस सेवा चालविली जाण्याची शक्यता आहे.
फेऱ्या वाढविण्याची गरज
पारडी येथून बसमध्ये बसलेले रामकृष्ण दुबे म्हणाले, मला दररोज बुटीबोरीला जावे लागते. बस सुरू झाली. चांगली बाब आहे. परंतु बसच्या फेऱ्या वाढविण्याची गरज आहे. त्यानतंरच बसचा फायदा होईल. प्रवाशांची संख्याही वाढेल. बर्डीवरून खापरीला जाणारी स्नेहल मेश्राम म्हणाली, बस सुरू झाल्याचा आनंद आहे. आधी ऑटोतून जावे लागत होते. जादा पैसे खर्च करावे लागत होते. बस दीर्घ कालावधीसाठी बंद ठेवणे योग्य नाही. .
अधिकारी कार्यालयातच
आठ महिन्यानंतर बस सेवा सुरू झाली. बस सेवेची जबाबदारी असलेल्या डिम्टस कंपनीचे अधिकारी मात्र बस सुटणाऱ्या स्थानकावर नव्हते. वास्तविक बस व्यवस्थित सोडल्या जात आहे की नाही. याची शहानिशा करण्याची जबाबदारी होती. ड्रायव्हर, कंडक्टर दिशानिर्देशाचे पालन करतात की नाही यावर नजर ठेवणे गरजेचे होते.
या मार्गावर धावल्या बसेस
- बर्डी ते हिंगणा ग्रामीण रुग्णालयादरम्यान १५ बस
- बर्डी ते बुटीबोरी एमआयडीसी गेट दरम्यान ९ बस
-बर्डी ते खापरखेडा दरम्यात ३ बस
- पिपळा फाटा ते हजारीपहाड दरम्यान ५बस
-पारडी ते जयताळा दरम्यान ८ मिडी बस