लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवाळी तोंडावर आली असली तरी आपली बस (शहर बस) कर्मचाऱ्यांना मागील सहा महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. नोव्हेंबर महिन्यात बस सुरू झाली. पण फक्त ९० बस धावत आहेत. पूर्ण क्षमतेने बससेवा अजूनही सुरू झालेली नाही. त्यामुळे यंदा त्यांची दिवाळी अंधारात जाण्याची भीती आहे.
बस कामगार संघटनेच्यावतीने थकीत वेतन मिळण्यासाठी जून महिन्यात मनपा सभागृहाबोहर आंदोलन करण्यात आले होते. परंतु मनपाचे कर्मचारी नसल्याचे सांगून प्रशासनाने आपली जबाबदारी झटकली. पदाधिकाऱ्यांनीही याकडे लक्ष दिले नाही. आपली बस सेवेत १ हजार कंडक्टर व १ हजार ड्रायव्हर आहेत. परंतु खासगी ऑपरेटरकडे काम करीत असल्याने आमचे कर्मचारी नाही, असे मनपा प्रशासनाचे म्हणने आहे. कोविड काळात ६० बस सेवेत होत्या. यावर १८० ड्रायव्हर आळीपाळीने ड्युटीवर होते. उर्वरित ड्रायव्हर व कंडक्टर घरीच होते. सध्या १०५ बस धावत आहेत. अद्याप पूर्ण क्षमतेने बससेवा सुरू झालेली नाही. परिणाम दिवाळी आली तरी बस कर्मचारी घरीच असल्याने दिवाळी कशी साजरी करावी. असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे.
कंत्राटदारांनी मदत करण्याची गरज
बस कर्मचारी खासगी ऑपरेटरकडे काम करीत असल्याने मनपाने आपली जबाबदारी झटकली. ऑपरेटरकडूनही मदत नाही. पण दिवाळीचा सण विचारात घेता ऑपरेटरने कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी कर्मचारी संघटनेने केली आहे.