नागपूर : लक्ष्मणराव जेवढे नि:स्पृह, भिडस्त व विरक्त स्वभावाचे आहेत, ते व्यक्तिमत्त्व त्यांच्या पुस्तकातही उतरले आहे. मात्र, हे पुस्तक म्हणजे त्यांचे चरित्र किंवा आत्मचरित्र नव्हे, असे वक्तव्य सद्गुरुदास महाराज उपाख्य विजयराव देशमुख यांनी केले.
माजी ज्येष्ठ संपादक ल. त्र्यं. जोशी यांच्या ‘गावोगावी’ या पुस्तकाचे प्रकाशन जयप्रकाशनगरातील गुरुमंदिरात झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संपादक श्रीपाद अपराजित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात निरूपणकार विवेक घळसासी व मकरंद कुळकर्णी उपस्थित होते.
या पुस्तकात लक्ष्मणरावांनी गोवा, जळगावचे अनुभव जेवढे दिलखुलासपणे मांडले आहेत, तेवढा कटाक्ष नागपूरवर टाकला नसल्याची खंत महाराजांनी यावेळी व्यक्त केली. पुढे तो करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
लक्ष्मणरावांचे लेखन शतप्रतिशत प्रामाणिक असून, ओढूनताणून काहीही लिहिलेले नाही. हे पुस्तक आत्मस्पंदन असून अनुभूती एकच असल्याचे समाधान यातून जाणवते. अनुभवाची ही शिदोरी व पाथेय असल्याचे विवेक घळसासी यावेळी म्हणाले. देविका मार्डीकर हिने शारदास्तवन व पसायदान सादर केले तर संचालन ज्येष्ठ पत्रकार विनोद देशमुख यांनी केले. यावेळी माजी ज्येष्ठ संपादक सुधीर पाठक, ज्येष्ठ पत्रकार मेघनाद बोधनकर, डॉ. म.रा. जोशी, प्रकाश मुळावकर, ऊर्मिला जोशी, रसिका देशमुख उपस्थित होते.
................