नागपूर: नागपूर पोलीस दलातील एका सहायक पोलीस निरीक्षकाने जगातील पाचव्या क्रमांकाचे उंच शिखर असलेले हिमालयातील माऊंट मकालू सर करण्यात यश मिळविले. शिवाजी ननवरे असे या एपीआयचे नाव असून अशी कामगिरी करणारे महाराष्ट्र व नागपूर शहर पोलीस दलातील ते पहिले अधिकारी ठरले आहेत हे विशेष.
ननवरे हे मुळचे सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्यातील कोंढेज येथील रहिवासी आहेत. माउंट मकालु हे जगातील पाचव्या क्रमांकाचे उंच शिखर आहे. नेपाळ-चीन सीमेवर स्थित या शिखराची उंची ८,४८५ मीटर इतकी आहे. या शिखरावर खडकाळ भाग जास्त असल्याने सात हजार मीटर उंचीनंतर चढाईला खूप त्रास होतो. त्यामुळेच बरेच गिर्यारोहक त्याकडे पाठ फिरवितात.
यावर्षी या शिखरावर चढाईसाठी ३६ गिर्यारोहकांना परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे केवळ ९ जणांनाच शिखर सर करता आले. भारतातून शिवाजी ननवरेच यशस्वी ठरले. सातत्याने हवामान बदलत असल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. शिखर सर करण्याची मोहीम ५५ दिवस चालली. ननवरे यांना २०१८ साली पोलीस महासंचालक पदक तर २०१९ साली केंद्र सरकारचे आंतरिक सुरक्षापदक व खडतर सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.
इच्छाशक्तीतूनच गाठले शिखरमाऊंट मकालू चढत असताना अनेक अडथळे आले. हवामान बदलत असल्यामुळे चढाई करणे आव्हानात्मक होते. अनेकांनी मोहीम मधातूनच सोडली. आपणही परत फिरावे का असा विचार क्षणासाठी मनात आला होता. मात्र काहीही करून शिखर सर करायचेच असा संकल्प घेतला आणि इच्छाशक्तीतूनच शिखर गाठले. वरिष्ठांचे मार्गदर्शन व सहकार्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला असे मत शिवाजी ननवरे यांनी व्यक्त केले.