नागपूर : रेल्वेचे ऑनलाइन तिकिटाच्या रिफंडसाठी ॲप डाऊनलोड करायला लावून एका व्यक्तीच्या खात्यातील ५ लाख ८१ हजार ९९८ रुपये आरोपीने उडविले. ही घटना सोमवारी दुपारी घडली.
प्रमोद वसंता मेश्राम (वय ३५, रा. धरतीमाता सोसायटी, डम्पिंग यार्ड जवळ, वाठोडा) हे राजस्थान येथे नोकरीला आहेत. त्यांच्या नागपुरातील घराचे बांधकाम सुरू करायचे असल्यामुळे ते वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत बहिणीच्या घरी आले होते. त्यांनी मोबाइलवरून रेल्वेचे तिकीट बुक केले होते. परंतु तिकीट वेटिंग मिळाल्याने त्यांनी तिकीट रद्द केले. त्यांना दोन दिवसांत तिकिटाचा रिफंड मिळणार होता.
दरम्यान, मोबाइल क्रमांक ८५३८८६३७०९च्या धारकाने फोन करून त्यांना आपण आयआरसीटीसीकडून बोलत असल्याचे सांगितले. रिफंडची रक्कम मिळविण्यासाठी त्यांना ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यांनी ॲप डाऊनलोड करताच त्यांच्या आयसीआयसीआय बँकेच्या खात्यातील ५ लाख ८१ हजार ९९८ रुपये सायबर गुन्हेगाराने ऑनलाइन ट्रान्सफर करून त्यांची फसवणूक केली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी आरोपीविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
..................