अत्याचाराची तक्रार नोंदविताच मिळणार मदत : हेल्पेज इंडियाचा पुढाकारसुमेध वाघमारे नागपूरकधी काळी आई-वडिलांना देव मानणाऱ्या मुलांना त्यांचे वृद्धत्व ओझे वाटू लागले आहे. ज्येष्ठांच्या ‘आधाराची काठी’ होण्यापेक्षा त्यांच्या जगण्यावरच गदा आणली जात आहे. गेल्या वर्षी ‘हेल्प एज इंडिया’ संस्थेच्या अहवालात देशात ज्येष्ठ नागरिकांवरील अत्याचारात ५९ टक्के वाढ झाल्याची नोंद आहे. यावर उपाय म्हणून या संस्थेने ‘हेल्पेज एसओएस’ हे अॅप आणले आहे. या अॅपवर अत्याचार होत असल्याची माहिती देताच त्यांच्या मदतीसाठी चमू पोहोचणार आहे; सोबतच त्यांना आरोग्यापासून ते त्यांच्यासाठी असलेल्या विविध योजनांचीही माहिती यातून मिळणार आहे.हेल्प एज इंडियाच्या २०१४ च्या अहवालात नागपुरात ८५ टक्के वृद्धांवरील अत्याचाराच्या नोंदी आढळल्या आहेत. गेल्या वर्षीच्या अहवालात तरुणांनीच मध्यमवर्गीयांमधील ज्येष्ठ सुरक्षित नसल्याचे म्हटले आहे. मुलगा, मुलगी व जावईच्या तुलनेत सुनबाईकडून ज्येष्ठांवर सर्वाधिक अत्याचार होत असल्याचे अहवालातून पुढे आले आहे. पोटच्या मुलांकडून ज्येष्ठांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण २७.९ टक्के आहे. मुलीकडून होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण २०.२ टक्के, जावयाकडून होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण १५.३ तर सुनबाईकडून होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण ५०.२ टक्के आहे. ज्येष्ठांशी उद्धट बोलण्याचे प्रमाण नागपुरात ८६.६ टक्के आहे. शारीरिक छळाचे प्रमाण ४६.३ टक्के आहे, तर ज्येष्ठांची आर्थिक कुंचबणा करण्याचे प्रमाण १९.५ टक्के आहे. या अॅपमुळे ज्येष्ठांना तत्काळ मदत मिळणार असल्याने, हे प्रमाण काहीसे कमी होण्याची शक्यता हेल्पेज इंडियाचे अधिकारी वर्तवीत आहेत. अत्याचाराची माहिती द्याया ‘अॅप’संदर्भात अधिक माहिती देताना ‘हेल्प एज इंडिया’ नागपूरचे व्यवस्थापक प्रमोद गणवीर, वरिष्ठ कार्यकारी हेमंत दानव यांनी सांगितले, ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि त्यांना मदत करू इच्छिणाऱ्यांसाठी हे ‘अॅप’ मोलाचे ठरणार आहे. ‘अॅप’च्या एका क्लिकवर सामाजिक कार्यकर्त्यांची चमू त्यांच्य दारी पोहोचेल, तसेच जे ज्येष्ठांना मदत करू इच्छितात अशा युवकांनी हे अॅप डाऊनलोड करावे. त्यांनी केलेल्या तक्रारीची माहिती गुप्त ठेवण्यात येईल. या अॅपमुळे ज्येष्ठांवरील अत्याचारच कमी होणार नाही तर त्यांना आरोग्यापासून ते त्यांच्यासाठी असलेल्या योजनांचीही माहिती यातून मिळणार आहे. हे ‘अॅप’ जागतिक ज्येष्ठ नागरिक शोषण जागरूकता दिनाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी सर्व मेट्रो सिटीमध्ये लोकार्पण करण्यात आले.
ज्येष्ठांच्या मदतीसाठी आले ‘अॅप’
By admin | Published: June 15, 2016 3:06 AM