लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’चा संसर्ग वाढत असताना मनपाकडून होत असलेल्या हलगर्जीचीदेखील अनेक प्रकरणे समोर येत आहेत. १३ ऑगस्ट रोजी चाचणी केलेल्या एका व्यापाऱ्याला ‘आरोग्यसेतू’ या ‘अॅप’च्या माध्यमातून पाच दिवसानी तो ‘पॉझिटिव्ह’ असल्याचे कळाले. यानंतर चाचणी केली असताना तो ‘निगेटिव्ह’ असल्याचा अहवाल आला. विशेष म्हणजे संबंधित व्यक्ती हा भाजपाच्या महिला मोर्चा अध्यक्ष किर्तीदा अजमेरा यांचा मुलगा असून या प्रकारामुळे त्यांच्या कुटुंबीयांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. आश्चर्याची बाब म्हणजे ‘निगेटिव्ह’ आल्यानंतरदेखील २९ ऑगस्टपर्यंत त्याला ‘होम क्वारंटाईन’ करण्याचे मनपाने निर्देश दिले आहेत.मनपाने व्यापाऱ्यांसाठी ‘कोरोना’ची चाचणी अनिवार्य केली. त्यामुळे सिद्धार्थ अजमेरा यांनी प्रकृती एकदम ठणठणीत असतानादेखील अमरावती मार्गावरील विद्यार्थी वसतिगृहातील केंद्रातून १३ ऑगस्ट रोजी चाचणी केली. जर अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला तर सायंकाळी फोनवरुन कळविण्यात येईल, असे त्यांना सांगण्यात आले. त्यांना कुठलाही फोन आला नाही. त्यामुळे ते निश्चिंत झाले. यादरम्यान किर्तीदा अजमेरा यांनी १८ आॅगस्ट रोजी सहजपणे ‘आरोग्यसेतू’ हे ‘अॅप’ पाहिले. यात सिद्धार्थ ‘पॉझिटिव्ह’ असल्याचे दाखविण्यात आले. त्यामुळे कुटुंबीयांना मोठा हादरा बसला. सर्व सदस्यांनी तात्काळ जवळच्या खासगी प्रयोगशाळेत जाऊन चाचणी केली. सर्वांचा अहवाल दुसऱ्या दिवशी ‘निगेटिव्ह’ आला. हा अहवाल घेऊन किर्तीदा अजमेरा मनपाच्या केंद्रात पोहोचल्या. तेथे मनपाच्या डॉक्टरांनी सिद्धार्थला काही औषधे देऊन एक ‘स्टीकर’ दिले व २९ ऑगस्टपर्यंत ‘क्वारंटाईन’ राहण्याचा आदेश दिला. नागरिकांना अशा पद्धतीने मनस्ताप का दिला जात आहे, असा प्रश्न किर्तीदा अजमेरा यांनी उपस्थित केला आहे.अहवाल येईपर्यंत ‘क्वारंटाईन’ का नाही ?अहवालाची माहिती देण्यात विलंब का करण्यात आला व अहवाल येईपर्यंत ‘होम क्वारंटाईन’ राहण्यास का सांगण्यात आले नाही असा प्रश्न किर्तीदा अजमेरा यांनी उपस्थित केला आहे. सिद्धार्थला आता ‘कोरोना’चा संसर्ग नाही तरीदेखील घरावर ‘क्वारंटाईन’चे ‘स्टीकर’ लागलेले आहे. अनेकदा रुग्ण आपोआपच ठीक होतो असे उत्तर ‘कोव्हीड’ केंद्रात देण्यात आले. अहवालाची माहिती का कळविण्यात आली नाही याबाबत मनपाचा कुठलाही अधिकारी उत्तर देण्यास तयार नाही, असे त्यांनी सांगितले.
‘अॅप’मुळे पाच दिवसानी ‘पॉझिटिव्ह’ची कळाली माहिती : मनपाचा हलगर्जीपणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 10:05 PM
‘कोरोना’चा संसर्ग वाढत असताना मनपाकडून होत असलेल्या हलगर्जीचीदेखील अनेक प्रकरणे समोर येत आहेत. १३ ऑगस्ट रोजी चाचणी केलेल्या एका व्यापाऱ्याला ‘आरोग्यसेतू’ या ‘अॅप’च्या माध्यमातून पाच दिवसानी तो ‘पॉझिटिव्ह’ असल्याचे कळाले.
ठळक मुद्देपरत चाचणीत भाजप महिला अध्यक्षांचा मुलगा निघाला ‘निगेटिव्ह’