लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर महानगरपालिका कॉन्ट्रॅक्टर वेलफेअर असोसिएशनच्या कार्यकारिणीचा कार्यकाळ ऑगस्ट २०२० मध्ये पूर्ण झाला. सहा महिने उलटल्यानंरही निवडणुका न घेतल्याने संघटनेशी संबंधित काही कंत्राटदारांनी कार्यकारी समितीच्या विरोधात धर्मादाय आयुक्तांकडे अपील दाखल केले आहे.
१४ ऑगस्ट २०२० रोजी संघटनेच्या कार्यकारिणीचा कार्यकाळ पूर्ण झाला. त्यानंतरही अध्यक्ष व सचिवांनी निवडणूक घेण्याची प्रक्रिया न करता कामकाज सुरू ठेवले. समितीने कामकाज पुढे सुरू ठेवण्यासाठी आयुक्तांचीही मंजुरी घेतली नाही. त्यामुळे कंत्राटदारांनी याला विराेध केला. सप्टेंबरमध्ये कंत्राटदारांच्या एका समूहाने धर्मादाय आयुक्तांकडे या संबंधात तक्रार केली होती; परंतु पुढे काहीही न झाल्याने आता अपील दाखल केले आहे. धर्मादाय आयुक्तांकडून अध्यक्ष व सचिवांना नोटीस जारी करण्यात आली आहे. २४ मार्च रोजी सुनावणीही झाली. १२ एप्रिल २०२१ पर्यंत त्यांना उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निवडणूक पुढे ढकलण्याबाबत सदस्यांना कुठलीही माहिती देण्यात आली नाही. याचिकाकर्त्यांकडून ॲड. गौरव खोंड यांनी बाजू मांडली.