नागपूर : खून प्रकरणातील सहा आरोपींना निर्दोष सोडण्याच्या निर्णयाविरुद्ध राज्य सरकारने दाखल केलेले अपील मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुणवत्ताहीन ठरवून फेटाळून लावले. अपीलवर न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
ही घटना अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया येथील असून आरोपींमध्ये लतीश गजभिये, मेहनाथ गजभिये, साजन मेश्राम, ओमप्रकाश गजभिये, चंद्रकांत गजभिये व राजेश सुखदेवे यांचा समावेश होता. मयताचे नाव विजेश लांडगे होते. त्यांचा लतीशसोबत वाद होता. त्यातून आरोपींनी त्यांचा खून करण्याचा कट रचला व ९ मार्च २०१५ रोजी त्यांना डोळ्यात मिरची पावडर टाकून काठ्यांनी जबर मारहाण केली. परिणामी, त्यांचा मृत्यू झाला असे सरकारचे म्हणणे होते. १० ऑक्टोबर २०१९ रोजी सत्र न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष सोडले. या खटल्यात सरकारतर्फे १८ साक्षीदार तपासले होते. परंतु, त्यांना आरोपींविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यात अपयश आले.