नागपूर : नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजप समर्थित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार यांनी गुरुवारी अर्ज दाखल केला. भाजपने ऐनवेळी गाणार यांना समर्थन दिले असले तरी प्रत्यक्षात अर्ज दाखल करीत असताना आ. मोहन मते, आ. परिणय फुके, माजी आमदार अनिल सोले, गिरीश व्यास उपस्थित होते. मात्र, राज्यपातळीवरील इतर नेते व आमदारांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले.
गाणार यांची कार्यशैली लक्षात घेता अनेकांचा त्यांच्या उमेदवारीला विरोध होता. यावेळी गाणार यांच्याऐवजी शिक्षक आघाडीतील एखादा उमेदवार उभा करावा, असा अनेकांचा सूर होता. परंतु, काही आमदार व पदाधिकाऱ्यांचा विरोध असतानादेखील भाजपने महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार यांनाच पाठिंबा देण्याची घोषणा केली. केंद्रपातळीवरूनच त्यांचे नाव आल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला. गुरुवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत असताना गाणार हे समर्थकांसह विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचले. यावेळी त्यांचे समर्थक उपस्थित होते.
भाजपमध्ये कुणीच लहान-मोठा नेता नाही
भाजपचा एकही मोठा नेता उपस्थित नसल्याच्या मुद्द्यावर गाणार यांना विचारणा केली असता त्यांनी पक्षात कुणीच लहान व मोठा चेहरा नसतो. प्रत्येकजण दिलेली जबाबदारी पार पाडत आहे, असे उत्तर दिले. निवडणूक लढत असताना जुनी पेन्शन योजना, टीईटी, मराठी माध्यमांच्या शाळांचे संरक्षण व शिक्षक सेवेशी मुद्दे हे प्रमुख मुद्दे राहणार आहे. मी कुणालाही स्पर्धक मानत नाही. एकतर्फी निवडणूक जिंकणार आहे, असा दावा त्यांनी केला.
‘जुनी पेन्शन’च्या टोपीने वेधले लक्ष
यावेळी गाणार हे ‘एकच मिशन, जुनी पेन्शन’ असे लिहिलेली टोपी घालून आले होते. जुन्या पेन्शनसाठी माझा लढा सुरू राहील, असे त्यांनी यावेळी सांगितले. आश्चर्याची बाब म्हणजे हिवाळी अधिवेशनादरम्यानच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुनी पेन्शन योजना शासन देणार नाही, असे स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर गाणार यांनी जुन्या पेन्शनचा लढा सुरू राहणार असल्याची भूमिका घेतल्याने त्यांच्यात व भाजपमध्ये एकवाक्यता नाही हेच दिसून आले.