श्रीनिवास खांदेवाले : दुसऱ्या अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचा समारोपनागपूर : भारतात तीन लाखांवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. याचा देश आणि राज्याच्या राजकारण व अर्थकारणावर परिणाम झाला नाही. दबाव वाढले तेव्हा पॅकेज जाहीर करून वेळ निभावून नेली. शेतकऱ्यांचे दु:ख, दारिद्र्य संपविण्यासाठी सरकारला ग्रामीण कृषी अर्थव्यवस्था विकसित करणे गरजेचे आहे. परंतु सरकारजवळ नियोजनाचा आराखडाच नाही. ज्या देशात ६० टक्के लोक ग्रामीण भागात राहतात त्याला प्राधान्यक्रमच नाही. त्यामुळे आत्महत्यांचे सत्र वाढताना दिसत आहे. शेतकऱ्यांच्या दारिद्र्यमुक्तीसाठी शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांनी मार्शल प्लॅन तयार केला होता. शेतकऱ्यांसाठी हा मार्शल प्लॅन लागू करणे गरजेचे आहे, असे मत अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी व्यक्त केले. अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ संघटनेतर्फे दोन दिवसीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी संमेलनाचा समारोप झाला. समारोपीय कार्यक्र मात अध्यक्ष म्हणून खांदेवाले यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत आपली भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाला शेतकरी संघटनेचे नेते गुणवंतराव पाटील, माजी आमदार सरोजताई काशीकर, ज्येष्ठ साहित्यिक व कादंबरीकार रावसाहेब बोराडे, संमेलनाचे कार्याध्यक्ष गंगाधर मुटे उपस्थित होते. या संमेलनात सर्वानुमते शरद जोशी यांना ‘युगात्मा’ही लोकउपाधी देण्यात आली. याप्रसंगी सरोज काशीकर म्हणाल्या की, शेतकरी विकासाच्या नावावर लुटल्या गेला आहे. सरकारने कायद्याचे निर्बंध घालून त्याला बेड्या घातल्या आहे. शेतकऱ्यांची सर्व बाजूने कोंडी झाली आहे. शरद जोशी यांच्या मार्शल प्लॅननुसार शेतमालाच्या आयातीवर बंधने घालून निर्यातीला प्रोत्साहन द्या, निर्यातीसाठी ३० टक्के सूट द्या, शेतीला उद्योगाचा दर्जा द्या तरच खऱ्या अर्थाने भारताचा विकास होईल. याप्रसंगी गुणवंतराव पाटील म्हणाले की, शरद जोशी यांनी १९९३ मध्ये लेखाजोखा आंदोलन पुकारले होते. यात सरकारने शेतकऱ्यांना कशा पद्धतीने लुटले, हे शरद जोशी यांनी सरकारपुढे मांडले होते. शेतकरी सरकारचा कुठलाही देणेदार नाही. त्याच्यावरचे सरसकट कर्ज काढून टाकले पाहिजे. त्याला आधुनिक तंत्रज्ञान पुरविले पाहिजे. सातव्या वेतन आयोगाला शेतकऱ्यांनी पुढे येऊन विरोध केला पाहिजे, अशी भावना पाटील यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन जगदीश भगत यांनी केले. (प्रतिनिधी)कवितेतून मांडले शेतकऱ्यांच्या दु:ख, वेदनेचे प्रतिबिंबदु:ख, आक्रोश, वेदना आणि मन हेलावून सोडणारे शब्दांचे बाण कविसंमेलनात शेतकऱ्यांच्या अवस्थेची जाणीव करून देत होते. ही जाणीव करून देताना सरकार आणि राजकीय नेत्यांवरील संताप व्यक्त होतानाही दिसत होता. शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरील एका कवितेत राजकारणाचा समाचार घेताना कवी म्हणाला, कोणी म्हणतो हिरवा, कोणी म्हणतो भगवा, अबे शेतकरी मरून रायला, पहिले त्याले जगवा. शहरे स्मार्ट होत असताना, गाव भकास होत आहे. जगाचा पोशिंदा आत्महत्येकडे वळल्यामुळे, ग्रामीण भागात उदासी पसरली आहे. या वातावरणावर लक्ष वेधताना कवी विजय विलेकर यांच्या कवितेतून ही भीती व्यक्त होताना दिसते. ते म्हणतात, ‘आत्महत्येची किंचाळी पडते दुरून, अरे व्हारे बाबा जागे हाती मशाल घेऊन...’ कवी रवींद्र कामठे हे सुद्धा सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणावर टीका करताना म्हणतात, ‘कोपलेल्या निसर्गावर मात करण्याचे धाडस होते, मातलेल्या सरकारचे डोके कुठे होते...’ कवी रविपाल शेतकऱ्यांची वेदना मांडताना म्हणाले, ‘अस्तित्वाने जाहीरनामा कालच प्रसिद्ध केला, जी वस्तू दान केल्या जाते, तिचा निर्माता मेला.’ यासारख्या एकाहून एक मनाला झोंबणाऱ्या कविता दुसऱ्या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनात आयोजित करण्यात आलेल्या कविसंमेलनात सादर करण्यात आल्या. कविसंमेलनाचे अध्यक्षपद ज्ञानेश वाकुडकर यांनी भूषविले. संमेलनात दिलीप भोयर, नवनाथ पवार, प्रा. मनीषा रिठे, धीरज ताकसांडे, डॉ. विशाल इंगोले, श्रीकांत धोटे, शैलजा कारंडे, वृषाली पाटील, दामोदर जराहे, सुमती वानखेडे, रामकृष्ण रोगे, सांडोभाई शेख, सुरेश बेलसरे, मोरेश्वर झाडे, राजेश जवंजाळ या कवींनी आपल्या कविता सादर केल्या.
शेतकऱ्यांसाठी शरद जोशींचा मार्शल प्लॅन लागू करा
By admin | Published: February 22, 2016 3:13 AM