नागपूर : तृतीयपंथी कैद्यांना हाताळण्यासाठी राज्यातील कारागृहांमध्ये तृतीयपंथी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी आणि तृतीयपंथी कैद्यांसाठी प्रत्येक कारागृहात स्वतंत्र बराक तयार करावी, अशा मागण्या तृतीयपंथी उत्तमबाबा सेनापतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला केल्या आहेत.
उत्तमबाबा हा तृतीयपंथी चमचम गजभिये याच्या खून प्रकरणात मुख्य आरोपी असून तो ५ जून २०१९ पासून मध्यवर्ती कारागृहात आहे. त्याला पुरुष कैद्यांच्या बराकीत ठेवण्यात आले आहे. दरम्यान, पुरुष कैद्यांनी त्याच्यावर वारंवार बलात्कार केला. त्याचा मानसिक छळ केला. त्यासंदर्भातील तक्रारीची कुणीच दखल घेतली नाही. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर धंतोली पोलिसांनी उत्तमबाबाच्या तक्रारीवरून संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला. उत्तमबाबाने आता वरील मागण्यांसाठी आणि गृह विभागाचे मुख्य सचिवांना याचिकेत प्रतिवादी करण्याची परवानगी मिळण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 'राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण' प्रकरणामध्ये दिलेल्या निर्णयानुसार तृतीयपंथीयांच्या आत्मसन्मानाचे संरक्षण होणे आवश्यक आहे, असेही त्याने अर्जात नमूद केले आहे. उत्तमबाबातर्फे ॲड. राजेश नायक कामकाज पाहणार आहेत.