नागपूर : गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होऊन ५ वर्षे होत आहे; परंतु या कालावधीत वैद्यकीय शिक्षण विभागाने आवश्यक पदे भरलीच नाहीत. यामुळे दरवर्षी एमबीबीएसच्या जागेला घेऊन राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून होणाऱ्या तपासणीत उसनवारी पदस्थापना केली जाते. आता २५ ते २७ दरम्यान होणाऱ्या तपासणीत मेडिकलमधील तब्बल २४ डॉक्टरांची गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयात उसनवारी तत्त्वावर पदस्थापना करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण विभागाने दिले आहेत. राज्यात सार्वधिक रुग्ण नागपूर जिल्ह्यात आढळून येत असताना, डॉक्टरांची कमतरता असताना काढलेल्या या आदेशाचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या १५० जागा आहेत; परंतु जागेसाठी लागणारे पदे भरण्यास वैद्यकीय शिक्षण विभागाने दुर्लक्ष केले. यामुळे येथील विद्यार्थी अडचणीत आले आहेत, रुग्णसेवेतही आवश्यक ती मदत होत नसल्याच्या तक्रारी आहेत. एमबीबीएसच्या जागेला मंजुरी देण्यासाठी ‘राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगा’कडून महाविद्यालयाची तपासणी होते. यात रिक्त पदे लपविण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभाग उसनवारी तत्त्वावर पदस्थापना दाखविते. धक्कादायक म्हणजे, आयोगाला याची माहिती असतानाही कागदाची पूर्तता केल्याचे पाहून तेही याकडे दुर्लक्ष करते.
यावर्षी नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. दैनंदिन रुग्णसंख्येचा विक्रम मोडीत निघत आहे. मृत्यूच्या संख्येतही वाढ झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत ‘क्लिनिकल’ डॉक्टर कमी पडत असल्याने मेडिकल प्रशासनाने ‘नॉन क्लिनिकल’ डॉक्टरांवर कोरोना रुग्णांची जबाबदारी टाकली आहे. गंभीर स्थिती असताना वैद्यकीय शिक्षण विभागाने गुरुवारी नागपूर मेडिकलमधील २४ डॉक्टरांची तात्पुरती पदस्थापना गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयात करण्याचे आदेश दिले. त्याचे पत्र आज, शुक्रवारी मिळाल्याने डॉक्टरांमध्ये असंतोष पसरला आहे. पदस्थापना करणाऱ्यांमध्ये ६ प्राध्यापक व १८ सहयोगी प्राध्यापक आहेत.