लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्राचे सुपुत्र शरद बोबडे यांची सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी निवड झाल्यामुळे अभिमानाने ऊर भरून आले आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे न्यायव्यवस्थेला नवचैत्यन्य मिळेल, अशी भावना मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी सोमवारी विधानसभेत व्यक्त केली.सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी शरद बोबडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल सोमवारी विधानसभेत त्यांचे अभिनंदन करण्यात आले. मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. ते म्हणाले, मूळचे नागपूरचे असलेले शरद बोबडे यांचे अभिनंदन नागपूरच्याच अधिवेशनात करता आले, हा दुर्मिळ योगायोग आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी न्या. बोबडे यांनी प्रयत्न केले आहेत. सरन्यायाधीशपदाच्या कारकिर्दीत ते अन्नदात्याला नवचैतन्य मिळवून देतील, असा विश्वासही मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला. बोबडे कुटुंबाचे नागपूरमधील निवासस्थान म्हणजे कायद्याचे वटवृक्ष असून त्या माध्यमातून अनेक निष्णात कायदेतज्ज्ञ तयार झाले आहेत. रामशास्त्री बाण्याने ते न्यायदान केल्याशिवाय राहणार नाही, अशी खात्री बाळगतो असे सांगत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या सुपुत्राचे अभिनंदन केले.यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा त्यांचे अभिनंदन केले.सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे अतिशय साधं आणि शेतकऱ्यांप्रती आस्था असलेलं व्यक्तीमत्व असून महाराष्ट्राच्या सुपुत्राला मन:पूर्वक अभिवादन करूया, असे प्रतिपादन केले.मुख्यमंत्र्यांनी घेतले राजकीय चिमटेमुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचे सभागृहात पहिलेच भाषण होते. त्यामुळे ते काय बोलतात, कसे बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावेळी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अभिनंदनाचा प्रस्तावानेच त्यांच्या भाषणाला सुरुवात झाली. सरन्यायाधीश बोबडे यांच्या कार्याचे कौतुक करीत असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजकीय चिमटेही काढले. सध्या शरद ऋतू सुरू असल्याचा उल्लेख करीत हा ऋतू म्हणजे नवचैत्यन्याचा असून सरन्यायाधीश बोबडेंच्या रूपाने नवचैत्यन्य येईल, असे सांगितले. काही लोकांना कलाकार म्हणजे काहीच करू शकत नाही, असे वाटते, परंतु सरन्यायाधीश बोबडे हे सुद्धा एक कलावंतच आहेत. एखाद्या राजकीय नेत्याचा मुलगा राजकारणात आला म्हणजे ती घराणेशाही आहे, असे बोलले जाते, असे सांगत सरन्यायाधीश बोबडे यांचे वडील, आजोबा व एकूणच कुटुबांचे न्यायदान क्षेत्रात असलेल्या योगदानाचा उल्लेख करीत कौतुक केले. तसेच सध्या संसदेने केलेल्या कायद्याचे प्रकरण न्यायालयात असून या प्रकरणातही सरन्यायाधीश बाबेडे हे रामशास्त्री बाण्याने निर्णय देतील, असा विश्वास व्यक्त केला.बोबडे यांच्या घरी थांबले होते स्वातंत्र्यवीर सावरकरविरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सरन्यायाधीश बोबडे यांच्या कार्याचे कौतुक करीत राजकीय चिमटा काढला. ते म्हणाले, बोबडे यांचे संपूर्ण कुटुंबच एक न्यायसंस्था आहे. त्यांचे घर हे स्वातंत्र्यसैनिकांसाठी आधार होते. स्वातंत्र्यवीर सावरकर हे सुद्धा न्यायमूर्ती बाबेडे यांच्या घरी राहून गेलेत. ते खरे स्वातंत्र्यवीर होते म्हणूनच बोबडे कुटुंबियांनी त्यांचे आदरतीथ्य केले.
विधिमंडळाने सरन्यायाधीशांचा सत्कार करावा : उपसभापती
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाल्यानिमित्त न्या. शरद बोबडे यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान परिषदेत मांडण्यात आला. या प्रस्तावावर बोलत असताना विधिमंडळाने महाराष्ट्राचे सुपुत्र असलेल्या सरन्यायाधीशांचा मुंबईत विशेष सत्कार करावा, अशी भावना उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मांडली. सोमवारी कामकाजाच्या सुरुवातीलाच सभागृह नेते सुभाष देसाई यांनी अभिनंदन प्रस्ताव मांडला. सरन्यायाधीश बोबडे यांनी सुरुवातीच्या काळात कर्जमाफीसंदर्भातील मुद्दे कायद्याच्या भाषेत सर्वांसमोर मांडले होते व ते सर्वांना पटवूनदेखील दिले होते. शेतकºयांचे खटले ते विना मोबदला लढायचे, असे यावेळी देसाई यांनी प्रतिपादन केले. सरन्यायाधीशांचे विधी क्षेत्रासोबतच सामाजिक कार्यातदेखील मौलिक योगदान राहिले. शरद जोशी यांच्या कर्जमुक्ती आंदोलनात बोबडे यांनी कायद्याचा भक्कम पाठिंबा दिला होता, अशी माहिती यावेळी भाजपचे अनिल सोले यांनी दिली. न्या. बोबडे हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असल्याची भावना सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केली. शरद बोबडे यांच्या कुटुंबीयांशी लहानपणापासूनचे संबंध आहेत. त्यांचे काम जवळून पाहिले असून, सभागृहात त्यांचे अभिनंदन होत आहे ही नागपूरकर म्हणून अभिमानाची बाब असल्याचे मत भाजपचे गिरीश व्यास यांनी व्यक्त केले. यावेळी जोगेंद्र कवाडे, शरद रणपिसे, कपिल पाटील यांनीदेखील अभिनंदन प्रस्तावावर आपल्या भावना बोलून दाखविल्या.
हस्तिदंताच्या मनोऱ्यातील सरन्यायाधीश नाहीतसाधारणत: विधी क्षेत्रातील मोठे लोक किंवा सरन्यायाधीश हे हस्तिदंती मनोऱ्यात राहतात, असा अनेकदा लोकांचा समज असतो. परंतु सरन्यायाधीश शरद बोबडे हे सामान्यांतून समोर आले आहे. त्यांना तळागाळातील समस्यांची जाण आहे व त्यांच्या कार्यकाळात न्यायपालिकेच्या कामाचा वेग आणखी वाढेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे हेमंत टकले यांनी व्यक्त केला.