कोराडी : महानिर्मितीचे संचालक (निर्मिती) चंद्रकांत थोटवे यांचा कार्यकाळ ३१ ऑगस्ट २०२० रोजी संपला. याला पाच महिन्याचा कालावधी होऊन गेला असला तरी महानिर्मितीला संचालक(निर्मिती)पदासाठी योग्य उमेदवार मिळालेला नाही. या पदासाठी वारंवार निवडीच्या प्रक्रिया पूर्ण केल्या जात असताना योग्य उमेदवाराची नियुक्ती का केली जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
२६ फेब्रुवारी २०२१ ला यासंदर्भात पुन्हा मुलाखती घेण्यात आल्या. या पदावर या मुलाखतीच्या माध्यमातून कुणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातच २६ फेब्रुवारीला महानिर्मितीने कार्यकारी संचालकाकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला. काही काळापासून महानिर्मितीतील संचालक (निर्मिती) हे पद चर्चेत राहिले आहे. थोटवे यांनी सलग तीन वर्षे या पदाचा कार्यभार पाहिला. त्यानंतर त्यांना एक वर्षाची मुदतवाढही देण्यात आली. यापूर्वी थोटवे हे संचालक (प्रकल्प) म्हणून सलग दोन टर्म एकूण सहा वर्षे व त्यानंतर एक वर्षाचा वाढीव कारभार या पदावर होते. थोटवे यांनी महानिर्मितीत संचालक (प्रकल्प) म्हणून सात वर्षे व संचालक (निर्मिती) म्हणून चार वर्षे अशी सेवा दिली आहे. त्यानंतर ते ३१ ऑगस्ट २०२० ला संचालक (निर्मिती) या पदावरून निवृत्त झाले. महानिर्मितीच्या माध्यमातून या पदासाठी २१ ऑगस्ट २०२० ला उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. परंतु या मुलाखती प्रक्रियेनंतर योग्य उमेदवाराची निवड करण्यात आली नाही. या मुलाखतीचा निकालही जाहीर करण्यात आला नाही. यानंतर ऊर्जा सचिव असीम गुप्ता यांची बदली झाली. ३१ ऑगस्ट २०२० ची निवड प्रक्रिया पूर्ण रद्द करून, २६ फेब्रुवारीला पुन्हा याच पदासाठी निवड प्रक्रिया राबविण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार, या मुलाखतीला महानिर्मितीतील सात वरिष्ठ अधिकारी व महानिर्मितीच्या बाहेरील एक अशा एकूण आठ उमेदवारांनी मुलाखती दिल्या. यावेळी तरी महानिर्मितीला संचालक (निर्मिती) मिळतील, अशी अपेक्षा होती. अजूनही या मुलाखतीचा निकाल जाहीर करण्यात आला नाही. या पदासाठी वीजनिर्मिती (संचलन व सुव्यवस्था) क्षेत्रात मुख्य अभियंता व त्यावरील पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणे महत्त्वाचे आहे.