आशिष रॉय
नागपूर : आर्थिक संकटात असतानादेखील नियमबाह्य पद्धतीने जनसंपर्क एजन्सीला कंत्राट दिल्यामुळे एमएसईबी होल्डिंग कंपनीकडे संशयाची सुई रोखली गेली असताना तेथील आणखी एक गैरप्रकार समोर आला आहे.
राज्यातील कॅबिनेट मंत्र्याच्या नजीकच्या पत्रकाराची कुठलाही अनुभव नसताना कॉर्पोरेट कम्युनिकेशन सरव्यवस्थापकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती करताना सर्व नियमांकडे दुर्लक्ष करण्यात आले. होल्डिंग कंपनीच्या वतीने महाजेनकोचे मुख्य महाव्यवस्थापक (एचआर) आनंद कोंड यांनी ही निवड केली व संबंधित पत्रकार प्रमोद चुंचुवार आता महिन्याला एक लाख रुपये कमवत आहेत.
कंपनीने जून २०२१ मध्ये संबंधित पदासाठी जाहिरात दिली होती. पदव्युत्तर पदवी किंवा जनसंवादात पदविका, उमेदवाराला सरकारी/खाजगी क्षेत्रातील संबंधित क्षेत्रात १५ वर्षांचा पदव्युत्तर अनुभव असावा, हजारपेक्षा जास्त कर्मचारी संख्या असलेल्या मोठ्या आणि प्रतिष्ठित संस्थेमध्ये जनसंपर्क / कॉर्पोरेट कम्युनिकेशन्सचे व्यवस्थापन हाताळण्याचा अनुभव मागण्यात आला होता. प्रमोद चुंचुवार यातील अनेक निकष पूर्ण करत नाहीत.
२०१५ साली त्यांनी अमरावती विद्यापीठातून पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदव्युत्तर पदवी पूर्ण केली होती आणि अशा प्रकारे त्यांना केवळ ७ वर्षांचा पदव्युत्तर अनुभव आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी त्यांच्या कारकीर्दीत पत्रकार म्हणून काम केले होते आणि त्यांना जनसंपर्क / कॉर्पोरेट कम्युनिकेशन्सचा अनुभव नाही. त्यांनी मुंबईस्थित काही इंग्रजी, प्रादेशिक दैनिके व वृत्तवाहिन्यांत कार्य केले आहे.
यासंदर्भात कोंड यांना विचारणा केली असता चुंचुवार हे पात्रतेचे सर्व निकष पूर्ण करतात व त्यांची नियुक्ती बेकायदेशीर नाही, असा दावा त्यांनी केला. या पदासाठी १५ उमेदवारांनी अर्ज केले होते व त्यातील ९ जणांना मुलाखतीसाठी बोलविण्यात आले होते, असे त्यांनी स्पष्ट केले.