आशिष रॉय
नागपूर : २ हजार ४३४ कोटी रुपयांच्या नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाकरिता येत्या सहा महिन्यात सल्लागाराची नियुक्ती केली जाईल, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.
या प्रकल्पाकरिता काही प्रमाणात अर्थसाहाय्य करणार असलेल्या जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीने प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्तीचा प्रस्ताव अमान्य केला होता. त्यामुळे जलशक्ती मंत्रालय या आठवड्यात नवीन प्रस्ताव सादर करणार आहे. हा सूक्ष्म अडथळा दूर झाल्यानंतर सल्लागाराची नियुक्ती होईल, असेही गडकरी यांनी सांगितले.
महानगरपालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालयाने ११ जून २०२१ रोजी 'एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट' प्रसिद्ध केले आहे. मंत्रालयाने मूल्यमापन समिती स्थापन केली आहे. गुणवत्ता व खर्चावर आधारित निवडही पूर्ण झाली आहे. दरम्यान, सल्लागार नियुक्तीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. परंतु, निकष पूर्ण झाले नसल्यामुळे जपान एजन्सीने प्रस्ताव नाकारला. परिणामी, यासंदर्भात नवीन प्रस्ताव दिला जाणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सहा महिने वेळ लागेल.
प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार सहा महिन्यानंतर नागपूरला येतील व मनपाला टेंडर दस्तावेज तयार करण्यासाठी मदत करतील. त्यानंतर ते दस्तावेज जपान एजन्सीसह केंद्र व राज्य सरकारला मंजुरीकरिता पाठविले जातील. तिघांची मंजुरी मिळाल्यानंतर टेंडर नोटीस प्रकाशित केली जाईल. यशस्वी कंपनीला कंत्राट दिल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. ही प्रक्रिया पुढच्या वर्षापर्यंत पूर्ण होईल.