दोन मिनिटात पोलीस : सात मिनिटात अॅम्बुलन्स नागपूर : अपघात झाल्यानंतर मदतीला धावल्यास पोलिसांचे लचांड मागे लागेल, असे समजून अपघातग्रस्तांना मदत करण्याचे टाळले जाते. त्यामुळे बराच वेळ जखमी तडफडत राहतो. माहिती कळल्यानंतरही पोलीस विलंबाने पोहचतात. हा नेहमीचाच अनुभव आहे. मात्र, आज एक सुखद अनुभव आला. अपघातानंतर अवघ्या दोन मिनिटात पोलीस पोहचले अन् सात मिनिटात अॅम्बुलन्स आली. जखमीला तातडीने मदत मिळाली. हो, ही सुखद घटना आणि प्रशंसनीय तत्परता शुक्रवारी सायंकाळी ६ च्या सुमारास व्हीएनआयटी गेटसमोर अनेकांनी अनुभवली. एका बेदरकार मोटरसायकलचालकाने आधी कारला आणि नंतर एका सायकलस्वाराला धडक मारली. सायकलस्वार रस्त्यावर पडून बेशुद्ध झाला. वर्दळीचा मार्ग त्यामुळे मोठी गर्दी जमली. परंतु, बघे नुसतेच बघत होते. काही तरुणांनी दोषी मोटरसायकलचालकाला घेरले अन् त्याच्यावर राग काढू लागले. काहींनी मारहाणही केली. या गर्दीतील प्रणव नामक विद्यार्थ्याने मात्र लगेच फोन काढला. १०८ क्रमांकावर फोन करून अपघाताची माहिती दिली. घटनास्थळ समजावून सांगितले. नंतर १०० क्रमांकावर फोन करून पोलिसांनाही कळविले. विशेष असे की दोनच मिनिटात पोलीस पोहचले. अन् अवघ्या सात मिनिटात अॅम्बुलन्स आली. जखमी व्यक्तीला तातडीने वैद्यकीय मदत मिळाली. उपराजधानीच्या रस्त्यावर आज ही प्रशंसनीय तत्परता बघायला मिळाली. फोन करणाऱ्या प्रणवसोबतच पोलीस अन् अॅम्बुलन्स चालकाचेही अनेकजण बराचवेळ तोंडभरून कौतुक करीत होते. (प्रतिनिधी)अॅम्बुलन्सची लिंकअॅम्बुलन्सला फोन करताच प्रणव यांच्या मोबाईलवर एक लिंक आली. या लिंकमध्ये गुगल मॅपच्या आधारे घटनास्थळाकडे येणारी अॅम्बुलन्स सध्या कुठे आहे व कोणत्या मार्गाने येत आहे याची माहिती मिळाली. नाव सांगण्याची गरज नाहीघटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी प्रणवला अजिबात त्रास दिला नाही. सर्व आटोपल्यावर प्रणवने बीट मार्शल नरेंद्र यांना विचारले की मला थांबायचे आहे का, काही अधिकची माहिती हवी आहे का ? मात्र, कुठल्याही माहितीची गरज नाही, असे नरेंद्र यांनी सांगितले. एवढ्यात प्रणव यांना एक फोन आला व अॅम्बुलन्स पोहचली का याची विचारणा केली. भविष्यात अशी घटना घडली तर पुन्हा फोन करा, असे आवाहनही प्रणवला करण्यात आले.
प्रशंसनीय तत्परता
By admin | Published: May 07, 2016 3:02 AM