कृष्णा खोपडे : ३०.६३ कोटीतून साकारणार पहिले हायटेक कार्यालयनागपूर : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पूर्व नागपूरला गेल्या पाच वर्षांपासून स्वत:ची इमारतच नव्हती. डिप्टी सिग्नल येथील नागपूर सुधार प्रन्यासचे (नासुप्र) सभागृहात भाडेतत्त्वावर कार्यालयाचा कारभार सुरू होता. याची दखल आ. कृष्णा खोपडे यांनी घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या संदर्भात पाठपुरावा केला. नुकतेच या कार्यालयाच्या बांधकामासाठी ३० कोटी ६३ लाख रुपयांचा प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी मिळाली. यामुळे देशातील हे पहिले हायटेक कार्यालय असणार आहे. वाढते शहर, वाढती वाहने व वाढती गर्दी लक्षात घेऊन पूर्व नागपुरसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यात आले. पूर्व नागपूरकरांची ‘एम. एच. ४९’ अशी नवी ओळख निर्माण झाली. सुरुवातीपासून स्वतंत्र कार्यालयाच्या जागेसाठी प्रयत्न सुरू होते. परंतु जागेची समस्या मार्गी न लागल्यामुळे सुरुवातीला नागपूर शहर प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या तळमाळ्यावर हे कार्यालय सुरू करण्यात आले. या कार्यालयाचा पदभार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांच्याकडे येताच त्यांनीही आपल्या परीने स्वतंत्र जागा मिळविण्यासाठी प्रयत्न चालविले. तत्कालीन प्रादेशिक परिवहन अधिकारी (शहर) सर्जेराव शेळके यांच्या मार्गदर्शनात चिखल देवस्थान, डीप्टी सिग्नल येथील पाण्याच्या टाकीजवळील नासुप्रचे सभागृह भाडेतत्त्वावर मिळण्यास यश आले. गेल्या दीड वर्षांपासून येथे कार्यभार सुरू आहे. पूर्व आरटीओ कार्यालयाला स्वत:ची जागा असावी यासाठी आ. खोपडे यांनी विशेष प्रयत्न केले. अखेर डिप्टी सिग्नल येथील चिखली ले-आऊट येथे नासुप्रची चार एकरची जागा बऱ्याच प्रयत्नानंतर पूर्व आरटीओला मिळण्यास यश आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जानेवारी महिन्यात मुंबई येथे झालेल्या बैठकीत बांधकामाच्या प्रस्तावास मान्यता मिळाली. त्या अनुषंगाने परिवहन आयुक्त श्याम वर्धने यांनी जागेची पाहणी केली. ६ एप्रिल रोजी ३० कोटी ६३ लाख रुपयांच्या बांधकामाला प्रशासकीय मंजुरी मिळाली. यामुळे लवकरच कार्यालयाचे बांधकाम सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.(प्रतिनिधी)
पूर्व आरटीओच्या बांधकामाला मंजुरी
By admin | Published: April 10, 2016 3:12 AM