मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक : विकासाचा मार्ग मोकळा नागपूर : नासुप्रच्या विश्वस्त मंडळाने यापूर्वीच मान्यता दिलेल्या महानगर प्रारूप विकास आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गुरुवारी मुंबई येथे आयोजित महानगर नियोजन समितीच्या बैठकीत सदस्यांच्या सूचनांसह मंजुरी देण्यात आली. प्रारूप विकास आराखड्याला मंजुरी देण्यासाठी समितीची मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. कृपाल तुमाने, आ.अनिल सोले, सुधाकर कोहळे, सुधाकर देशमुख, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, डॉ. मिलिंद माने, समीर मेघे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊ त, नासुप्रचे विश्वस्त भूषण शिंगणे, सदस्य प्रशांत धवड, दीपक कापसे, संजय महाकाळकर, रेखा बाराहाते, आयुक्त श्रावण हर्डीकर,नासुप्रचे सभापती दीपक म्हैसेकर यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते. महानगर नियोजन क्षेत्रात जिल्ह्यातील ९ तालुक्यातील ७२१ गावांचा समावेश आहे. २०११ च्या जनगनणेनुसार यात ३५६७ चौरस किलोमीटर क्षेत्रातील १०.६२ लाख लोकसंख्या आहे. महानगर नियोजन क्षेत्राचा नियोजनबद्ध विकास व्हावा म्हणून नियोजन प्राधिकरण म्हणून नासुप्रवर जबाबदारी सोपविली. त्यानुसार नासुप्रने २०फेब्रुवारी २०१५ रोजी महानगर विकास प्रसिद्ध केला होता. या आराखड्यावर ६ हजार ६४९ आक्षेप नोंदविण्यात आले होते. यातील ५० टक्के आक्षेप जमीन वापराबाबत होेते. २५ टक्के आक्षेप जमीन आरक्षणावर तर ९ टक्के रस्त्यासंदर्भातील होते. (प्रतिनिधी) सदस्यांची उघड नाराजी नियोजन समितीवरील सदस्य निवडून आलेले आहेत. परंतु नियोजन आराखडा तयार करताना समितीच्या सदस्यांना विश्वासात घेतले नाही. आराखड्यात पांधण रस्ते, सुपीक जमिनीवर खेळाचे मैदान दर्शविण्यात आले, असे आक्षेप नोंदवित सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. सदस्यांच्या सूचनांचा विचार केला जाईल. शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
महानगर विकास आराखड्याला मंजुरी
By admin | Published: August 05, 2016 3:07 AM