नागपूर : बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानात भविष्यातील विविध प्रकल्पांना लागणाऱ्या पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी याेजनेला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच गाेरेवाड्याच्या धर्तीवर चंद्रपूर येथे प्राणी उद्यान निर्मितीसाठी सल्लागार नेमण्याच्या प्रक्रीयेला गती देण्याचे निर्देश वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक गुरुवारी हिंगणा रोडवर स्थित महामंडळाच्या मुख्यालयात पार पडली. यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. वाय. एल. पी. राव, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विकास गुप्ता, मुख्य महाव्यवस्थापक संजीव गौड, कंपनी सचिव सौरभ सिंह उपस्थित होते.
गोरेवाडा प्रकल्पांतर्गत भविष्यात आफ्रिकन सफारी, नाईट सफारी, गोंडवाना संग्रहालय आदी प्रकल्प हाेणार असून त्यांच्या संचलनासाठी पाण्याच्या व्यवस्थेचे नियोजन नागपूर महानगरपालिकेमार्फत तसेच स्वत: महामंडळाने पाईपलाईनद्वारे करण्यास मुनगंटीवार यांनी मान्यता दिली. गोरेवाडाच्या धर्तीवर चंद्रपूर येथे प्रस्तावित असलेल्या प्राणी उद्यानाच्या निर्मीतीसाठी महामंडळाला सल्लागार नेमण्याकरिता निविदेची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानुसार सदर प्रस्तावास शासनाकडून मंजुरीसाठी पाठपुरावा करण्याचे निर्देश मुनगंटीवार यांनी दिले.
सेंट्रल व्हिस्टा (नवीन संसदभवन), राम जन्मभूमी निर्माणासाठी महामंडळाच्यावतीने मागणीनुसार चिराण सागवान पाठविण्यात आले होते. तसेच, राम जन्मभूमी निर्माणासाठी प्राप्त अतिरिक्त मागणीस मंजुरी देण्यात आली. महामंडळाकडे असलेल्या उर्वरित चिराण सागवानापासून फर्निचर व तत्सम वस्तु तयार करण्याचे निर्देश मुनगंटीवार यांनी दिले.