नितीन गडकरी यांची घोषणा : सावनेर, खापा, पारशिवनी,रामटेक, भंडारा, कुही, कामठी राष्ट्रीय महामार्ग होणारनागपूर : नागपूर शहराच्या बाह्य भागातून जाणाऱ्या दुसऱ्या आऊटर रिंग रोडच्या १७०० कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी देण्यात आली असून लवकरच या कामाच्या निविदा काढल्या जातील, अशी घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केली. सोबतच सावनेर, खापा, पारशिवनी, आमडी फाटा रामटेक, भंडारा, कुही, उमरेड, कामठी या २३५ किमीच्या मार्गाचा राष्ट्रीय महामार्ग म्हणून विकास करण्याची घोषणाही गडकरी यांनी केली.मध्यप्रदेश- महाराष्ट्र सिमेपासून मनसर पर्यंत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ च्या चौपदरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन शनिवारी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी केंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रकाश जावडेकर होते. विशेष अतिथी म्हणून ऊर्जामंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे,रामटेकचे खा. कृपाल तुमाने, आ. मल्लिकार्जुन रेड्डी, आ. प्रकाश गजभिये उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरच्या विकासाला गती देण्यासाठी संबंधित दोन्ही रस्त्यांची मागणी जोरकसपणे लावून धरली. सावनेर-खापा- पारशिवनी रामटेक- भंडारा- कामठी या रस्त्याचे सर्वेक्षण राज्य सरकारतर्फे करण्यात आले असून राज्य सरकारने त्याला मंजुरी दिली आहे. आता राज्य सरकारने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर केला आहे, असे सांगत या कामात येणारे अडथळे दूर करून त्यांना मंजुरी देण्यासाठी बावनकुळे यांनी गडकरी व जावडेकर यांना साकडे घातले. बावनकुळे यांच्या या मागणीची गडकरी यांनी दखल घेतली व संबंधित दोन्ही रस्त्यांबाबत घोषणा केली. सोबतच पोकळ घोषणा करणे आपल्याला जमत नाही. जे बोललो ते करून दाखवील, असे सांगत संबंधित दोन्ही रस्ते शक्यतेवढ्या लवकरच पूर्ण केले जातील, असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला. परसोडी खाणीचाही प्रश्न सुटला असून दोन महिन्यात कामाला सुरुवात होईल, असेही गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले. या वेळी जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, माजी आ. आशीष जैस्वाल, एस.क्यु. जमा, बळवंतराव ढोबळे, आनंदराव देशमुख, अशोक मानकर, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, राष्ट्रीय महामागार्चे प्रादेशिक अधिकारी चंद्रशेखर, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, जि.प.चे माजी अध्यक्ष रमेश मानकर, चंद्रपाल चौकसे, हुकूमचंद आमधरे आदी उपस्थित होते.
१७०० कोटींच्या आऊटर रिंग रोडला मंजुरी
By admin | Published: October 25, 2015 2:43 AM