लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील तरुणांना लाखो रुपये महिन्याचे आमिष दाखवून, त्यांना कर्जबाजारी करणाऱ्या टॅक्सी कंपन्या ओला व उबेर विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन छेडले आहे. येत्या १६ एप्रिल रोजी मनसेने ओला, उबेर टॅक्सी चालकांसोबत बंदचे आवाहन केले आहे. याला सर्व टॅक्सी चालक-मालकाचे समर्थन असल्याचे मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी पत्रपरिषदेत सांगितले.या टॅक्सी कंपन्यांनी नागपुरात आपला व्यवसाय सुरू करताना स्थानिक तरुणांना आमच्या सोबत व्यवसाय करा, लाख रुपयांपर्यंत महिना कमवा, अशी आमिष दाखविली होती. त्यामुळे मोठ्या संख्येने तरुणांनी कर्जबाजारी होऊन स्वत:ची वाहने घेतली. पुढे या कंपन्यांनी टॅक्सीचालकांचे कमिशन कमी केले. शिवाय स्वत:ची ओला-फिट ही टॅक्सी काढून व्यवसाय त्या टॅक्सीवर वळविला. त्यामुळे या टॅक्सी चालकांना आता महिन्याचा हप्ता भरणे सुद्धा कठीण झाले आहे. लाखो रुपये गुंतवून तरुणांची फसगत होत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. यासंदर्भात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ओला कंपनीचे शहरातील प्रमुख विशाल गुप्ता यांच्याकडे गारहाणी सुद्धा मांडली. त्यांनी टॅक्सीचालकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी चार दिवसांचा अवधी मागितला होता. परंतु कुठल्याही तक्रारी सोडविल्या नाही. उबेर कंपनीच्या प्रमुखांना मनसेचे शिष्टमंडळ भेटण्यास गेले असता, त्यांना पोलिसांकडून रोखण्यात आले. तरुणांना कर्जबाजारी करणाऱ्या टॅक्सी कंपन्यांचे मनमानी धोरण खपवून घेणार नाही, असा इशारा मनसेने दिला आहे. त्यासाठी १६ एप्रिलला बंद पाळण्यात येणार आहे. त्यानंतरही कंपन्यांनी गांभीर्याने न घेतल्यास, मनसे स्टाईल धडा शिकवू, असा इशारा गडकरी यांनी दिला. पत्रपरिषदेला चंदू लाडे, विशाल बडगे, अजय ढोके, श्याम पुनियानी, घनश्याम निखाडे, संगीता सोनटक्के, मनिषा पापडकर, उमेश उतखेडे, उमेश बोरकर, प्रशांत निकम, कपिल आवारे, सुजित वानखेडे, चंदन गुप्ता, किरण व्होलर, हर्षल हिरुळकर आदी उपस्थित होते.
नागपुरात १६ एप्रिलला ओला, उबेर बंदचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 8:20 PM
शहरातील तरुणांना लाखो रुपये महिन्याचे आमिष दाखवून, त्यांना कर्जबाजारी करणाऱ्या टॅक्सी कंपन्या ओला व उबेर विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन छेडले आहे. येत्या १६ एप्रिल रोजी मनसेने ओला, उबेर टॅक्सी चालकांसोबत बंदचे आवाहन केले आहे. याला सर्व टॅक्सी चालक-मालकाचे समर्थन असल्याचे मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
ठळक मुद्देटॅक्सी कंपन्यांच्या आडमुठ्याधोरणा विरोधात मनसेचे आंदोलन