लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : लाेखंडी राॅडने मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आराेप सिद्ध झाल्याने सावनेर येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ज. स. काेकाटे यांच्या न्यायालयाने आराेपीस एक वर्षाचा तुरुंगवास व दाेन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ही घटना ऑक्टाेबर २०११ मध्ये सावनेर शहरात घडली हाेती.
मनोज मोहनलाल बसवार (४२, रा. सावनेर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. त्याने आशिष महादेवराव आहवारे, रा. सावनेर यांच्याशी भांडण करीत लाेखंडी राॅडने मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. आशिष आहवारे यांच्या तक्रारीवरून सावनेर पाेलिसांनी ३० ऑक्टाेबर २०११ राेजी भादंवि ३२५, ५०६ अन्वये गुन्हा नाेंदवून प्रकरण तपासात घेतले. तपास पूर्ण झाल्यानंतर प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात आले.
प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ज. स. काेकाटे यांच्या न्यायालयाने या प्रकरणाचा मंगळवारी (दि. २४) निवाडा दिला. न्यायालयाने या प्रकरणात साक्ष, पुरावे तपासून मनाेज बसवार यास दाेषी ठरविले. आराेप सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्याला एक वर्षाचा तुरुंगवास व दाेन हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेचा भरणा न केल्या एक महिन्याच्या अतिरिक्त तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. या घटनेचा तपास सहायक फाैजदार अरविंद कुलकर्णी यांनी केला असून, सहायक फौजदार ज्ञानेश्वर अवझे यांनी न्यायालयीन कामकाजात मदत केली. ॲड. राहुल साेनवणे यांनी सरकारतर्फे तर ॲड. मनाेज खंदारे यांनी आराेपीतर्फे न्यायालयात युक्तिवाद केला.