नागपूर : तुम्ही कितीही सूचना, ईशारे द्या, कितीही कारवाया करा. विविध खाद्यपदार्थ, पेयजल विकणारे त्याला दाद द्यायला तयार नाहीत. मनाई असलेले अनधिकृत ब्राण्डचे खाद्यपदार्थ, पेयजल आणि विविध प्रकारचे ज्यूस ते रेल्वेस्थानकं आणि रेल्वेगाड्यांमध्ये बिनधास्त विकतात.
प्रारंभी रेल्वेत फेरीवाले चहा, कच्चा चिवडा, भेळ, शेंगदाणे, संत्रा गोळ्या, बिस्किट, काकडी वगैरे विकायचे. एका रेल्वेस्थानकावर फार तर एका डब्यात शिरून एक किंवा दोन विक्रेतेच हे पदार्थ अगदी पाच-दोन रुपयांत विकत होते. आता मात्र रेल्वे डब्यात अनधिकृत वेंडरची एकापाठोपाठ आरडाओरड सुरू असते. समोसे, कचोरी, विविध खाद्य पदार्थ, चहा, कॉफी, पाण्याच्या बाटल्यांसोबतच ही मंडळी वेगवेगळे ज्यूस अन् आईसक्रीमसुद्धा विकतात. ईतकेच काय गुटखाही मिळतो. रेट (भाव)ही तगडा असतो.
रेल्वेत खानपानाची सेवा अधिकृत असते. शुद्धता अन् दर्जा तपासून खानपानाचे पदार्थ विकण्यासाठी रेल्वेत अधिकृत वेंडर्स नेमले जातात. मात्र, अधिकृत पेक्षा अनधिकृत वेंडर्सचीच भाईगिरी बहुतांश रेल्वेगाड्यात चालते. त्यांच्यावर अधून मधून रेल्वेच्या वाणिज्य विभागाकडून कारवाईसुद्धा केली जाते. मात्र, त्याला ते काही जुमानत नाहीत.
विशेष म्हणजे, रेल्वे प्रशासनाकडन खानपान सेवा पुरविण्यासाठी अधिकृत (परवानाप्राप्त) खाद्यपदार्थ विकणारांची नियुक्ती केलेली असते. या अधिकृत वेंडर सोबत अनधिकृत वेंडरची नेहमीच बाचाबाची, हाणामारी होते. अनधिकृत वेंडरची संख्या जास्त असल्याने आणि ते संघटितपणे अधिकृत वेंडरवर चढाई करत असल्याने अधिकृत वेंडर त्यांच्या नादाला लागत नाहीत.
महिनाभरातील कारवाईचे स्वरूप
भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम १४४ (१) अंतर्गत अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध मे महिन्यात २७४१ प्रकरणे नोंदवण्यात आली. २७२९ अनधिकृत फेरीवाल्यांना अटक करून त्यांच्याकडून दंडापोटी १७, २७, ५८० रुपयेही वसूल करण्यात आले. या आकडेवारीतून मध्य रेल्वेत अनधिकृत फेरीवाल्यांची कशी बजबजपुरी आहे, ते स्पष्ट होते.