नागपूर : शेतात नुकसान झाल्यानंतर मोबाइल ॲपवर नोंदणी आणि ७२ तासांत कंपनीला कळवण्याच्या त्रासदायक अटीतून शेतकऱ्यांची सुटका झाली आहे. आता यासाठी सहा पर्याय देण्यात आले आहेत.
जिल्ह्यामध्ये यावर्षी चार लाख ६९ हजार हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी खरीप हंगामात कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकांची पेरणी केली. जिल्ह्यात जून, जुलै या महिन्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतामध्ये तसेच नदीकाठावरील शेतांमध्ये पाणी शिरून पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले शेतीचे नुकसान झाले. ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा काढला त्यांना कंपनीच्या नियमानुसार मोबाइल नोंदणी आणि कंपनीला कळवण्याची त्रासदायक अट होती. नेटवर्क प्रॉब्लेम व इतर अडचणींमुळे ते करणे शेतकऱ्यांना शक्य नव्हते त्यामुळे ते पीकविमा कंपनीच्या मदतीपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली होती. शासनाने पीकविमा कंपनीच्या मनमानीला ब्रेक लावून पिकांच्या नुकसानीच्या सहा पर्यायांच्या माध्यमातून अर्ज सादर करण्याची तरतूद आता केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
...
हे आहेत नवीन सहा पर्याय
1) नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज कृषी विभागात सादर करता येऊ शकतो.
2) शेतकऱ्यांनी ज्या बँकेतून पीककर्ज मिळवले आहे, त्या बँकेतही परिपूर्ण कागदपत्रांसह आपला अर्ज दाखल करू शकतो. शेतकऱ्यांना वरील दोन्ही पर्याय किचकट वाटत असतील तर आपल्या जवळच्या तहसील कार्यालयात शेतकरी आपल्या नुकसानीचा प्रस्ताव दाखल करू शकतो.
3) विमा कंपनीच्या नागपूर शहरातील कार्यालयातही ऑफलाइन पद्धतीने अर्ज दाखल केला जाऊ शकतो.
5) विमा कंपनीने दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर फोन लावून नुकसानीची माहिती दिली जाऊ शकते.
6) विमा कंपनीच्या नागपूर जिल्ह्यात असलेल्या कार्यालयाच्या ई-मेलवरही ऑनलाइन पद्धतीने प्रस्ताव दाखल केला जाऊ शकतो.
.....
अडीच लाख हजार हेक्टरवरील पिके बाधित
जून व जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे जिल्ह्यात सरासरी अडीच लाख क्षेत्रावरील पिके बाधित झाल्याचे कृषी व महसूल विभागाकडून अहवालात नमूद करण्यात आले आहे.
...
कोट
शेतातील नुकसानीच्या नोंदीसाठी मोबाइल ॲपवर नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना सहा सुविधा पर्याय दिले आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा आणि गैरसोय टाळावी.
- मिलिंद शिंदे, अधीक्षक, जिल्हा कृषी अधिकारी, नागपूर
...