निशांत वानखेडे, नागपूर : हुडकेश्वर चिखली परिसरातील चक्रपाणीनगर येथील नागरिकांमध्ये सध्या माेबाइल टाॅवरमुळे प्रचंड असंताेष पसरला आहे. एकतर कंपनीने प्रशासनासाेबत रहिवाशांचीही रीतसर परवानगी न घेता टाॅवर उभे केले. नागपूर सुधार प्रन्यासने स्थगिती दिली हाेती व लाेकांच्या विराेधामुळे कामही थांबले; मात्र एक रिकामा भूखंडधारक वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करून टाॅवरचे काम सुरू करण्यासाठी मनमानी करीत आहे. आर्थिक लाभ मिळविण्यासाठी ही व्यक्ती लाेकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आराेप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.
चक्रपाणीनगरच्या वैभवानंद गृहनिर्माण सहकारी संस्थेतील शंकर घाडगे नामक व्यक्तीच्या ३६ क्रमांकाच्या रिकाम्या भूखंडावर ऑगस्ट २०१७ मध्ये ३५ फूट उंच माेबाइल टाॅवर उभारण्यात आला. रहिवासी क्षेत्रात माेबाइल टाॅपर उभारण्यासाठी प्रशासनाकडून परवानगी घेण्यासाेबत स्थानिक रहिवाशांची संमती घेणेही बंधनकारक असताना रहिवाशांकडून एनओसी घेतली नाही आणि ‘नासुप्र’चीही रीतसर परवानगी घेतली नाही. टाॅवरच्या घातक रेडिएशनचा भविष्यात आराेग्यावर हाेणारा गंभीर धाेका लक्षात घेता स्थानिकांनी याविराधाेत प्रशासनाकडून तक्रार केली. त्यामुळे नासुप्रने ३१ ऑगस्ट २०१७ राेजी टाॅवरचे काम थांबविण्याचे आदेश दिले. ११ जानेवारी २०१८ ला पुन्हा स्मरणपत्र देऊन अनधिकृत टाॅवरचे बांधकाम ताेडण्याचा व खर्च वसूल करण्याचा इशारा भूखंडधारकाला दिला. यानंतर काम तर थांबले; पण टाॅवर काढण्यात आला नाही.
स्थानिकांच्या मते आता सदर भूखंडधारक वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करून टाॅवर सुरू करण्याचा प्रयत्न करताे आहे. काही दिवसांपूर्वी हा भूखंड एका व्यक्तीला लीजवर देण्याचे सांगून पुन्हा प्रयत्न चालविले. महापालिकेच्या नेहरूनगर झाेन कार्यालयातून परवानगी घेतल्याचे दाखविण्यात आले. त्यामुळे ‘नासुप्र’ने झाेन कार्यालयाला टाॅवरचे काम थांबविण्यासाठी पत्र दिले हाेते. आता नव्याने सदर भूखंडधारकांद्वारे नागरिक विराेध करीत असल्याने माेबाइल टाॅवरचे काम सुरू करण्यासाठी पाेलिस प्रशासनाकडे संरक्षण मागितले असल्याची माहिती समाेर आली आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये पुन्हा राेष उफाळून आला असून, शनिवारी याविराेधात आंदाेलन करीत टाॅवरच उखडून फेकण्याची मागणी केली आहे.