नागपूर : काेराेनाचा प्रकाेप आणि लाॅकडाऊनमुळे अनेकांनी त्यांच्या नाेकऱ्या गमावल्या आहेत. हाताला काम नसल्याने अनेकांच्या कुटुंबाची दयनीय अवस्था झाली आहे. पुरातत्त्व विभागातील राेजंदारी सफाई कर्मचाऱ्यांना याचा फटका बसला आहे. लाॅकडाऊनमध्ये कामावरून बंद केल्याने या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना वाईट परिस्थितीचा सामना करावा लागताे आहे.
गाेधनी निवासी सुमित माटे हा ६ वर्षापासून पुरातत्त्व विभागात सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत हाेता. मिळणाऱ्या तुटपुंज्या मिळकतीत ताे आईवडील व भावाचा सांभाळ करीत हाेता. मागील वर्षी मार्चपासून काेराेना महामारीने डाेके वर काढले. त्यामुळे टाळेबंदी केल्यानंतर मे २०२० मध्ये त्यांना कामावरून कमी करण्यात आले आणि संकटाची मालिका सुरू झाली. कुठेही काम नाही. त्यामुळे पैसा नसल्याने कुटुंबाची वाताहत सुरू झाली. दरम्यान वडील आजारी पडले. त्यांच्या उपचारासाठीही सुमितला अनेकांकडे हात पसरावे लागले. अशात वडिलांनी जगाचा निराेप घेतला. गेल्या वर्षभरापासून रिकामा असल्याने कुटुंबाला विदारक परिस्थितीतून जावे लागत असल्याची व्यथा सुमितने मांडली.
सुमितसह काम गमावलेल्यांमध्ये सतीश द्विवेदी, माणिक धाेपटे, साेनू बहादुरे व एका सुरक्षा रक्षकाचा समावेश आहे. हे सर्व १० ते १५ वर्षापासून सेवा देत हाेते. अचानक कामावरून काढल्याने त्यांच्यासमाेर संकट उभे ठाकले. पुन्हा कामावर घ्यावे म्हणून त्यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना विनंती केली. केंद्रीय मंत्र्यांसह अनेकांची भेट घेऊन व्यथा मांडली पण त्यांचे समाधान झाले नाही. या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला दाेन वेळच्या जेवणाचीही भ्रांत पडली असून अत्यंत वाईट परिस्थितीचा सामना करावा लागताे आहे. त्यामुळे पुरातत्त्व विभागाने सहानुभूतीपूर्वक विचार करून कामावर घ्यावे, अशी विनंती त्यांनी केली आहे.